हुकुमशाही पक्षात एक चेहरा, लोकशाहीत अनेक चेहरे : संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
Santosh Gaikwad
December 27, 2023 07:59 PM
मुंबई, दि. २८ः पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. परंतु, हुकूमशाही पक्षात चेहऱ्याला महत्व आहे. देशात सध्या हुकूमशाही आहे. सातत्याने एकच चेहरा समोर आणला जातो, असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. इंडिया आघाडी लोकशाही मानते. लोकशाही मानणाऱ्या पक्षात मात्र अनेक चेहरे असतात. कोणाला ही पंतप्रधान पदासाठीचा चेहरा निवडला जाऊ शकतो, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीत जिकेंल ती जागा हे सूत्र ठरले आहे. जागा वाटपावरून कोणतीही ओढाताण होणार नाही. उमेदवार निवडून आणायची पक्षांची क्षमता यावर तिन्ही पक्षांचे काम सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीला ही भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही विरोधात लढायचे आहे. मोदी पुन्हा निवडून आले तर देश हुकूमशाहीच्या खाईत लोटला जाईल, अशी प्रकाश आंबेडकर यांना भीती आहे. संविधानाचे महत्व आणि ते वाचविण्यासाठी आम्ही लढतो आहेत. या लढ्यात आंबेडकर आमच्या सोबत येतील, असे राऊत म्हणाले.
स्वातंत्र्याची लढाई, राम मंदिर आंदोलन, मुंबईतील संयुक्त महाराष्ट्राचा लढा आदी साहसपूर्ण लढ्यात भाजप नव्हता. दुसऱ्या विषयी असूया आणि पोटदूखी असलेली हे रणछोडदास पळपुटे असल्याची जोरदार टीका राऊत यांनी भाजपवर केली.