मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राऊतांनी याबाबत ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी पोलिसांवर दबाव आणला, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे.
सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. "हे सरकार बेकायदेशीर आहे. त्यांचा आदेश पाळू नका." संजय राऊतांना असं आवाहन केल्याने नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून राऊतांनी थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रयावर आरोप केले आहेत.
काय आहे राऊतांचे ट्विट ..
नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे "गठन"बेकायदेशीर ठरले आहे . व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्या पर्यंत सगळेच घटना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे.बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत . भविष्यात खटले दाखल होतील.असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का?सरकारने थेट गुन्हाच दाखल केला..मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे.
या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल.