राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल
नागपूर : खासदर संजय राऊत यांना आलेला धमकीचा फोन करणार्याची ओळख पटली असून प्राथमिक निष्कर्षानुसार ही व्यक्ती दारुच्या नशेत होती. या प्रकरणाचा सरकार तपास करेल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाईल. कुणीही धमकी दिली असेल तरी कारवाई निश्चितपणे केली जाईल. महाराष्ट्रात कुणी कुणाला धमकी दिली तर सरकार आणि पोलिस शांत बसणार नाही. सरकार त्यावर कारवाई करेल.
*मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेकांची अडचण*
झेपत नसेल तर राजीनामा द्या, या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानाबद्दल पत्रकारांनी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला कल्पना आहे की, मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. त्यांना मनातून वाटते की, मी गृहमंत्रीपदी राहू नये. पण, मी गृहमंत्री राहणार आहे. मला एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा पदभार दिला आहे. जे-जे चुकीचे काम करतील, त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. मी यापूर्वी 5 वर्ष गृहमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला आहे आणि आताही जे लोक बेकायदेशीर काम करतील, त्यांना मी सोडणार नाही. मी कुणाला घाबरत नाही, मी कुणाला दबत नाही. कायद्यानेच वागतो, जे काही काम करायचे आहे, तेही कायद्यानेच करतो. हे राज्य कायद्यानेच चालेल असेही फडणवीस म्हणाले.