ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, शिवाजी साटम यांना राज्यसरकारचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Santosh Gaikwad August 14, 2024 09:45 PM

  
मुंबई, दि. १४:  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन २०२३ चा स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे. स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन.चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली. 
 
हा पुरस्कार वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता एनएससीआय (NSCI) डोम, वरळी मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत,  अशी माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली.

 स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये १० लाख, मानपत्र व मानचिन्ह असे असून  स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये ६ लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.  चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये १० लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये ६ लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.
****