संविधान आणि लोकशाही प्राणपणाने जपण्याची वेळ : मधु मंगेश कर्णिक यांचे प्रतिपादन
Santosh Gaikwad
May 01, 2024 05:23 PM
मुंबई : डॉ बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे नेते हेाते. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी एक सूर्य निर्माण केला. सूर्याचा प्रकाश म्हणजे लोकशाही. देशाचे संविधान संपलं कि सगळं संपल. लोकशाही संपेल. त्यामुळे संविधान आणि लोकशाही प्राणपणाने जपण्याची वेळ आलेली आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यीक मधु मंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला केले. संविधानाने फार मोठी संधी आपल्याला दिली आहे. त्यामुळे न चुकता मतदान करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे लिखित महाराष्ट्राचा ६५ वर्षाचा इतिहास अधोरेखीत करणारे " मागे वळून पाहताना " या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत हाते.
मुंबई मराठी पत्रकार संघ मनीषा प्रकाशन, डिम्पल प्रकाशन यांच्यावतीने या पुस्तक प्रकाशन सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यीक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र विश्वनाथराव वाबळे, ऋतुरंगचे अरूण शेवते, मराठी बाणाचे अशोक हांडे, सचिन इटकर, डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे, पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे, कार्यवाह संदीप चव्हाण आदी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. वाचकांच्या उपस्थितीत पुस्तकाचे शानदार प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना मधु मंगेश कर्णिक म्हणाले की, मधुकर भावे यांनी महाराष्ट्राचा ६५ वर्षाचा चालता बोलता इतिहास लिहिलाय. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, सांस्कृतीकरण असं एकही क्षेत्र नाही, त्यात भावेंचा संचार झालेला नाही. आचार्य अत्रे म्हणजे मुलूख मैदान तोफ होती. त्यांच्या सावलीत मधुकराची वाढ झाली. ६५ वर्षानंतर मागे वळून पाहताना भावेंना आईने दिलेला कंदील नसेल पण त्या कंदीलाचा प्रज्वलीत दिवा झालेला आहे असेही ते म्हणाले.
१ मे १९६० चा महाराष्ट्र फारसा शिक्षीत नसला फारसा संपन्न नसला तरी मानसिकदृष्टया निवांत आणि समाधानी होता. ६५ वर्षानंतर खूप काही मिळालं असलं तरी खूप काही गमावलेलं आहे. आणि जे गमावले आहे ते पुन्हा मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही. कारण संस्कार लोप पावलेले आहेत. ते बाजारात विकत मिळत नाहीत. आज बाजारात जे विकत मिळतं. ते घरात शिकवलं जात नाही. त्यामुळे ६५ वर्षानंतर मागे वळून पाहताना बरेच काही हरवल्यासारखं वाटतं असा पुस्तकातील एक मजकूर कर्णिक यांनी वाचून दाखविला.
आईच्या कंदीलाच्या प्रकाशात ६५ वर्षाची वाटचाल : मधुकर भावे
मधुकर भावे म्हणाले की, महाराष्ट्राच्या ६५ वर्षाचा इतिहास लिहावा असे वाटले आणि ३५ दिवसात हे पुस्तक पूर्ण झाले. बाबूजी (जवाहरलाल दर्डा) नेहमीच सांगायचे वृत्तपत्राचा खरा वाचक ! पुस्तकाचा खरा मालक वाचक असतो. त्यामुळे वाचकांचा उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे ठरवले. १९५९ ला मुंबईत येण्यासाठी निघालो त्यावेळी न शिकलेल्या आईने मला कंदील दिला होता. बाळा, मुंबईत तुला काळोखात उपयोगी पडेल. ३५ वर्ष तो कंदील माझयाकडे जपून ठेवला होता. अशी आठवण मधुकर भावे यांनी सांगितली. त्यावेळी ते भावूक झाले. माझया न शिकलेल्या आईने मला खूप शिकवले. आज जे काय लिहितो बोलतोय त्या सगळयांचा आशिर्वाद आहे. आईने दिलेल्या त्या कंदीलाच्या प्रकाशात माझी ६५ वर्षाची वाटचाल झालेली आहे असे भावे यांनी सांगितले. हेमंत मंडलिक यांनी मधुकर भावे यांना कंदील भेट दिला. त्यावेळी पुस्तकावरील कंदीलाच्या कव्हर चित्राविषयी बोलताना भावे यांनी ही आठवण सांगितली.
मुधकर भावेंना " पुढारीकार गणपतराव जाधव पुरस्कार " घोषीत
मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा "पुढारीकार गणपतराव जाधव पुरस्कार " यंदा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि वाबळे यांनी केली. ५० हजार रूपये रोख शाल, श्रीफळ आणि आकर्षक चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वाबळे म्हणाले की, आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो. भावे साहेबांचा सहवास मार्गदर्शन आम्हाला लाभतोय. आचार्य अत्रेंना आम्ही जवळून पाहिलं नाही. मात्र भावेसाहेबांकडून त्यांच्या आठवणी ऐकताना आम्ही मंत्रमुग्ध होतो. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा योग येतो त्याविषयी भावे साहेबांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो.
यावेळी प्रेक्षकांमध्ये लोकमत समुहाचे सर्वेसर्वा विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आचार्य अत्रेंचे नातू राजेंद्र पै, विनाताई पै, हर्षवर्धन देशपांडे आदी मान्यवर उपस्थित हेाते. तर पुण्याचे प्रताप वाघ, साताराचे राजेंद्र शेलार, चंद्रपूरचे विनोद दत्तात्रेय, महाडच्या अँड स्वाती पाटील हे वाचक आवर्जून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांबरोबरच वाचक प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले तर भावेंची कन्या मृदुला यांनी आभार मानले.