जिद्दीचा ‘एव्हरेस्ट’; मुंबईकर गिर्यारोहक शरद कुलकर्णींचा अनोखा विक्रम

Santosh Sakpal July 19, 2023 07:22 PM


मुंबई,  (क्री.प्र.)- जगातील सात खंडातील अवघड मानली जाणारी सात शिखरे सर करायची मोहीम आणि तेही वयाच्या पन्नाशीनंतर... मुंबईकर गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांनी अफाट जिद्दीच्या जोरावर ही मोहीम यशस्वी करीत नवा विक्रम स्थापित केला. हा विक्रम रचत असताना या मोहिमेत एव्हरेस्ट शिखरावर मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या पत्नी अंजली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुसऱ्यांदा एव्हरेस्ट सर करून त्याच जागी तिला श्रद्धांजली अर्पण करण्याचे धाडस त्यांनी केले... त्यांच्या या धाडसाचे आणि जिद्दीचे क्रीडा जगतात कौतुक होत आहे...

वयाच्या पन्नाशीनंतर शरद कुलकर्णी यांनी ऑस्ट्रेलियातील माउंट कोशियुस्को पत्नी अंजलीसह सर केले. त्यानंतर या दोघांनी आफ्रिकेतील किलीमांजरो शिखर सर केले. तिसरी मोहीम होती ती माउंट एव्हरेस्टची. या मोहिमेत अंजली यांचे माउंट एव्हरेस्टवरील हिलरी स्टेप येथे २२ मे २०१९ ला अपघाती मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरून शरद कुलकर्णी यांनी अंजली यांना वचन दिल्याप्रमाणे उर्वरित चार खंडातील चार सर्व्वोच्च शिखरे सर केली आणि अनोखा विक्रम प्रस्थापित केला. यामध्ये अकांकागुहा (दक्षिण अमेरिका), देनाली (उत्तर अमेरिका), एलब्रस (युरोप), विन्सन (अंटार्टीका) या शिखरांचा समावेश होता. एव्हरेस्टसह सात शिखरे सर करणारा भारताचा सर्वात वयस्क गिर्यारोहक होण्याचा नवा विक्रम शरद कुलकर्णी यांनी स्थापित केला. वयाची ६० वर्षे ६ महिने आणि ३ दिवस पूर्ण झाली असताना माऊंट एव्हरेस्ट सर करून भारताचा सर्वाधिक वयस्क एव्हरेस्टवीर होण्याचा मान मिळवला.