शरद पवार आणि ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल : देवेंद्र फडणवीस
Santosh Gaikwad
May 08, 2024 09:13 PM
जळगाव : येत्या काळात देशभरातील छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये होईल, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केले. त्यांच्या याच विधानाचा धागा पकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला.
पक्ष चालविणे हे आता शक्य नसल्याचे शरद पवार यांच्या लक्षात आले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीतील पराभवाची चाहूलही त्यांना लागली आहे. त्यामुळे ४ जूननंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जळगाव लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल भाईदास पाटील, उमेदवार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील आदी नेते उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, पक्ष चालविणे यापुढे कठीण असल्याचे शरद पवार यांच्या लक्षात आले आहे. शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा राजकीय भूमिका बदलल्या, पक्ष तयार केले आणि पुन्हा काँग्रेसमध्येही गेले. आता पुन्हा एकदा त्यांनी तसेच संकेत दिले आहेत. लोकसभेनंतर अस्तित्व टिकविण्यासाठी शरद पवार त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. त्यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेही त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, असेही फडणवीस म्हणाले.