मुंबई : उच्च न्यायालयाने शनिवारचा बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला, मात्र शनिवारी ते स्वत: रस्त्यावर उतरणार आहेत. बंद नसला तरी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात काळ्या फिती लावून निषेध करणार आहोत, आंदोलन करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले.
शुक्रवारी दुपारी बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा संध्याकाळी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. उद्या महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून निषेध करणार आहे. मी शिवसेना भवनासमोरील चौकात उद्या सकाळी ११ वाजता तोंडाला काळ्या फिती लावून बसणार आहे. त्याला कोणी मनाई करु शकत नाही. त्याला मनाई केली तर जनतेचे न्यायालय आहे. भावना व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्वांना आपल्या कुटुंबाची काळजी आहे. बहीण, आईची काळजी आहे. तिचे रक्षण करणारे कोण आहे, हे सर्वांच्या मनात आहे. यामुळे बंद करायचा प्रयत्न केला. बंद कायद्यानुसार करता येत नसल्याने मी तोंडाला काळीफीत लावणार आहे. माझे रक्षण करण्यासाठी कोणी येत नाही असे लोकांना वाटते, तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात. बांगलादेशात ते सर्वांनी पाहिले आहे. ते आपल्या देशात होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आहेत. सरकार नराधमांना पाठीशी घालवत आहे. उत्स्फूर्तपणे आंदोलन करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवले जात आहे. ते स्वतःच्या विश्वात मश्गुल आहेत. त्यामुळेच आम्ही आंदोलन करत राहणार आहोत. लोकांना जागरूक करत आहोत, असेही ते म्हणाले.
तशीच तत्परता गुन्हे घडतात त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठीही दाखवा
दुपारी मी उद्याच्या बंदबाबत तुमच्याशी बोललो. उद्याच्या बंद बद्दल काही सूचना दिल्या होत्या. उद्याचा बंद विकृतीविरोधी होता. मात्र न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केली. न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकते हे कौतुकास्पद आहे. तुम्ही तत्परतेने निर्णय दिला, तशीच तत्परता तुम्ही जे गुन्हे घडता त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठीही दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. महिलांवरील अत्याचार करणारे जे नराधम आहेत, त्यांच्यावर वचक बसण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. बंद होणार नसलं तरी आंदोलन करणार आहोत. माता भगिनींसाठी सुरक्षित बहीण हे आंदोलन करणार आहोत.
शरद पवार यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.