महाविकास आघाडी भक्कम ठेवा, लोकसभा विधानसभा एकत्रीत लढवायच्या : राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांच्या सुचना
Santosh Gaikwad
May 17, 2023 04:28 PM
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठया हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुका एकत्रीत लढण्याचा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीने घेतला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज, बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. महाविकास आघाडी भक्कम ठेवा, लोकसभा आणि विधानसभा एकत्रितच लढवायच्या आहेत, असे शरद पवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी पवार यांनी पक्षातील नेत्यांना कानपिचक्या मारत आमदारांना सूचना दिल्या.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे आतापासूनच वाहू लागले असून, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुक लढविण्यावर चर्चा झाली. तसेच ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी क्रमांक दोनवर आहे, त्याची जबाबदारी विभागवार नेत्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्ष संघटनेत भाकरी फिरवणार जे तीन वर्षांपेक्षा जास्त जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षपदावर आहेत, त्यांना बदलण्यात येणार असून विभागवार शिबिरे घेण्यात येणार आहेत तसेच राज्यातील प्रश्नांवरच चर्चा होणार आहे.
नागपूर विभागाची जबाबदारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अमरावती विभागाची जबाबदारी राजेंद्र शिंगणे यांच्या कडे देण्यात आली आहे. तर नाशिक अहमदनगरसह मराठवाडा विभागाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. पुणे विभागाची जबाबदारी सुनील शेळके यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये अशोक पवार तर खानदेशची जबाबदारी एकनाथ खडसे आणि अनिल पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कोकण विभागाची जबाबदारी अनिकेत तटकरे आणि शेखर निकम यांच्याकडे देण्यात आली आहे.