शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट : मराठा आरक्षणावर चर्चा

Santosh Gaikwad July 22, 2024 06:00 PM


मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.


सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या  मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार  यांची भेट घेत सध्या राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे शरद पवार यांनी देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यांनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंधरा मिनिटे एकत्रित चर्चा झाली आहे.

या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी आतापर्यंत काय प्रयत्न केले, याबाबत माहिती दिली. शरद पवार यांनी याआधी सरकार मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन देत आहे याबाबत विरोधी पक्षाला काहीच माहिती नसते असे बोलून दाखवले होते. त्यानंतर आता शिंदे यांनी सरकारने मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय काय केले आहे, याची माहिती शरद पवार यांना दिली आहे. या भेटीनंतर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.