VIDEO : शरद पवार पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी, दर्शनानंतर व्यक्त केलं समाधान

Santosh Sakpal May 07, 2023 07:46 PM

शरद पवार ६ वर्षानंतर विठ्ठलाच्या दर्शानासाठी आले

sharad pawar darshan vitthal pandharpur
शरद पवारांनी घेतलं श्री विठ्ठलाचे दर्शन

शरद पवार यांनी मंगळवारी ( २ मे ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यापासून दोन दिवस पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, पक्षनेते, कार्यकर्त्यांच्या रेट्यानंतर निवृत्तीची निर्णय मागे घेत असल्याची घोषणा शुक्रवारी ( ५ मे ) शरद पवारांनी केली. यानंतर शरद पवार आज ( ७ मे ) पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी पवारांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे.

२०१७ नंतर शरद पवार विठुचरणी आले होते. तेव्हा ‘एबीपी माझा’शी बोलताना शरद पवारांनी सांगितलं, “देशात फार ठिकाणी मंदिरात जात नसतो. पण, काही मंदिर ही माझ्या अंत:करणात आहेत. त्यामध्ये पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचं मंदिर सुद्धा आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने मानसिक समाधान मिळतं.”


“विठ्ठल हा देशातील कष्टकरी सर्वसामान्यांचा दैवत आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून उन्हातान्हाचा विचार न करता, दर्शनासाठी याठिकाणी लोक येतात. त्यामुळे सामान्य माणसाला समाधान देणारे हे मंदिर आहे. मंदिरात मी येत असतो, पण त्याचा प्रचार करत नाही,” असं शरद पवारांनी सांगितलं.

दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे २०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अभिजीत पाटील हे पंढरपूर-मंगळवेढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.