माझा पाठिंबा होता तर देान दिवसात सरकार का पडले ? शरद पवारांचा फडणवीसांना सवाल

Santosh Gaikwad June 29, 2023 06:34 PM


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता. पण नंतर त्यांनी ऐनवेळी पाठ फिरवत डबलगेम केला, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट भूमिका मांडली. सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय बदलला होता, तर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ का घेतली ? माझा पाठिंबा होता तर देान दिवसात सरकार का पडले ? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. 


देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता ? असा आरोप केला होता. या आरोपाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलेय. पवार म्हणाले, फडणवीसांनी शपथ घेतली आणि आमचा त्यांना पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार राहिलं का तिथं? दोन दिवसात त्यांची सत्ता गेली त्यांना राजीनामा द्यावा लागला, याचा स्वच्छ अर्थ आहे की सत्तेसाठी आम्ही कुठे जाऊ शकतो ही फडणवीसांची पाऊले समाजासमोर यावी या दुष्टीने काही गोष्टी केल्या होत्या. शरद पवार म्हणाले, मी फसवलं तर देवेंद्र फडणवीस का फसले. मी म्हणेल राज्यपाल व्हा तर ते येतील का?. आमच्यात बैठका झाल्या. हा राजकीय डाव होता की डबल गेम होता याचा अर्थ काय काढायचा तो काढा. मला काही माहित नाही. 


शरद पवारांनी एक किस्सा सांगितला, ते म्हणाले "माझे सासरे होते सदू शिंदे ते देशातील प्रसिद्ध गुगली बॉलर होते. मोठ्या-मोठ्या लोकांच्या विकेट त्यांनी घेतल्या होत्या. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. गुगली कसा टाकायचा, कुठे टाकायचा हे जरी मी खेळलो नसलो. तरी विकेट दिली तर ती विकेट घेतलीच पाहिजे. त्यांची विकेट गेली हे फडणवीस सांगत नाहीत. देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी कुठे जाऊ शकतात. काय करु शकतात, हे समोर आले आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.


पवार म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चिंतेचा बनला आहे. महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. महिला आणि मुलींवरील हल्ले वाढले आहेत. २३ जानेवारी ते २३ मे दरम्यान ठाण्यातून ७२१  महिला बेपत्ता झाल्या, तर पुण्यातून ९३७ महिला गायब आहेत. याच काळात मुंबईतून ७३८ महिला बेपत्ता आहेत. राज्यातून गेल्या दीड वर्षात ६ हजार ८८९ महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी इतर वक्तव्ये करण्यापेक्षा या महिला कशा बेपत्ता झाल्या? त्यांचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली कशा करता येईल यासाठी उपाय करावेत असे पवार म्हणाले.