प्रफुल्ल पटेलांना सीबीआयकडून क्लिनचीटवर शरद पवार म्हणाले..,

Santosh Gaikwad March 30, 2024 09:04 PM


मुंबई:  एअर इंडियाचे विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या ८४० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बंद केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  गैरकृत्याचा कोणताही पुरावा नसल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने या प्रकरणात दाखल केला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयकडून मिळालेल्या क्लिनचीटवर भाष्य केलं आहे. 

शरद पवार यांनी भाजपावार निशाणा साधताना म्हटले की, ही चांगली बाब आहे. प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचिट देणारच. एक काळ असा होता की, प्रफुल्ल पटेल आमच्याकडे असताना आम्ही सर्वच चिंतेत असायचो. पण आता एक नवीन गोष्ट दिसते आहे. सध्या एक चर्चा सुरू आहे. ती म्हणजे तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपामध्ये गेलेलं बरं, असं जे म्हटलं जातं, ते खरं ठरताना दिसत आहे, असा टोला शरद पवार यांन यावेळी लगावला.


काय आहे प्रकरण ..

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये (यूपीए) नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले पटेल आणि एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अनियमिततेचे आरोप होते. एफआयआरनुसार एअर इंडियाने २००६ मध्ये खासगी पक्षांना फायदा होण्यासाठी चार बोईंग ७७७ विमाने पाच वर्षांसाठी भाड्याने दिली होती, तर जुलै २००७ पासून ते स्वतःच्या विमानांची डिलिव्हरी घेणार होते. परिणामी,२००७-०९ या कालावधीत पाच बोईंग ७७७ आणि पाच बोईंग ७३७ वापरण्यात आले नाहीत. यामुळे सरकारी तिजोरीचे ८४० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. एअर इंडियाकडून मोठ्या संख्येने विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या अनियमिततेच्या आरोपांशी संबंधित असून राष्ट्रीय वाहकाचे मोठे नुकसान झाले होते. याशिवाय खासगी व्यक्तींनाही आर्थिक लाभ झाला होता. या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, विमान भाड्याने घेण्याची व्यवस्था तत्कालीन मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या अधिपत्याखालील नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नॅशनल एव्हिएशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसीआयएल) केली होती. मात्र २०१७ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलं आहे.