मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात गुरूवारी जोरदार राडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली असून, ५० ते ६० अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ५० ते ६० अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस सर्वांची ओळख पटवून कारवाई करत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी भादवि कलम १४३,१४५,१४७,१४९ आणि मुंबई पोलिस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
काल शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या समाधीस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले. मुख्यमंत्री दर्शन घेऊन तेथून निघाल्यावर शिंदे आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आमनेसामने आले होते. दोन्ही गटांत शिविगाळ आणि बाचाबाची सुरू झाली होती. पोलिसांनी त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती.
पोलिसांनी आता घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली आहे. घटना घडली त्यावेळी ठाकरे गटाने असं म्हटलं की, आम्ही उद्याच्या तयारीसाठी तेथे उपस्थित राहिलो होतो. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माध्यमांशी काल संवाद साधला होता. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. तसेच समोरील गटातील व्यक्तींनी महिलांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की केल्याने वाद वाढल्याचा आरोप केला.
****