जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात जाब विचारु :- नाना पटोले

Santosh Gaikwad July 16, 2023 11:07 PM

मुंबई, दि. १६ जुलै : पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न घेऊन भाजपाप्रणित शिंदे सरकारला काँग्रेस पक्ष प्रश्न विचारेल. शेतकरी, कामगार, गरिब, महिला, कायदा व सुव्यवस्था, महागाई, तरुणांचे प्रश्न आहेत. राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांना शेतकरी व जनतेच्या प्रश्नांची त्यांना चाड नाही. महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे, यासह जनतेच्या  महत्वाच्या प्रश्नांवर सरकारला अधिवेशनात प्रश्न विचारु व सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.


अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर विरोधी पक्षांची बैठक पार पडली त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आमचा लढा सरकारविरोधात आहे, या लढ्यात जे पक्ष साथ देतील त्यांना बरोबर घेऊन हा लढा लढला जाईल. राज्यात आज असंवैधानिक सरकार सत्तेत बसलेले आहे, सप्रीम कार्टाने ताशेरे ओढलेले आहेत, शिंदे सरकार स्थापन होताना जे-जे निर्णय घेतले गेले ते सर्व चुकीचे होते असे कोर्टाने स्पष्ट केले आहे तरीही हे लोक खुर्चीला चिकटून बसले आहेत. भारतीय जनता पक्षाने लोकशाही व संविधानाचा गळा घोटला असून भाजपा हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे. 


शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर नाही. मदत जाहीर केली तरी ती अजून शेतकऱ्यांना पोहचलेली नाही. महागाई वाढली आहे, टोमॅटो महाग झाले तर महिनाभर टोमॅटो खाऊ नका असे कृषी मंत्री सांगतात, ही जनतेची थट्टा आहे, कृषी मंत्र्यांचे असे विधान असंवेदनशिल आहे. राज्यात सर्वत्र खड्डे पडलेले आहेत, जनतेच्या कष्टाच्या पैशाची लुट सुरु असून भ्रष्टाचार भरमसाठ वाढला आहे. विरोधी पक्ष या नात्याने भाजपा सरकारला अधिवेशनात घेरणार, असे पटोले म्हणाले.


अजित पवार गटाने खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, कोण काय करत आहे, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही विरोधक म्हणून सोबत येणाऱ्यांना बरोबर घेऊन लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई लढत आहेत. विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच होणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.