लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

Santosh Gaikwad July 25, 2023 10:54 PM


मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, सिने, क्रिकेट समीक्षक, चतुरस्त्र लेखक शिरीष कणेकर यांचे आज मंगळवार हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे आज (मंगळवार) सकाळी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या ‘लगाव बत्ती’ या कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर ‘सूरपारंब्या’ या लेखसंग्रहास सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा पुरस्कार मिळाला होता. 



शिरीष मधुकर कणेकर यांचा जन्म ६ जून १९४३ रोजी झाला. रायगड जिल्ह्यातील पेण हे त्यांचे मूळ गाव होते. शिरीष कणेकर यांचे वडील विख्यात डॉक्टर असल्याने त्यांचं बालपण भायखळा येथील रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानामध्ये गेलं. कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए.एलएलबी केले. इंडियन एक्सप्रेस, फ्री प्रेस जर्नल, डेली, सिंडिकेट प्रेस न्यूज एजन्सी या वर्तमानपत्रांसाठी त्यांनी काम केलं होतं. तसेच मुख्यत: मराठी वृत्तपत्रांतून त्यांची अनेक सदरे गाजली. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना, पुढारी, लोकमत , साप्ताहिक मनोहर, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक प्रभंजन, पाक्षिक प्रभंजन, पाक्षिक चंदेरी, साप्ताहिक चित्रानंद, सिंडिकेटेड कॉलम, द डेली (इंग्रजी) या सर्वांसाठी त्यांनी अनेक स्तंभलेख लिहीले.


शैलीदार, खुसखुशीत लेखन ही शिरीष कणेकरांची ख्याती. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावरील, त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ‘माझी फिल्लमबाजी’, ‘फटकेबाजी’ व ‘कणेकरी’ या तीन एकपात्री कार्यक्रमांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती व सादरीकरण त्यांनी केले. त्याला प्रेक्षकांचा आणि कलाकारांचाही उदंड प्रतिसाद मिळाला.


क्रिकेट-वेध , गाये चला जा, यादोंकी बारात (इ.स. १९८५), पुन्हा यादोंकी बारात (इ.स. १९९५), ते साठ दिवस, डॉलरच्या देशा, अशी अनेक हिंदी चित्रपटांलवरील तसेच प्रवासवर्णन करणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहीली. तसेच रहस्यवल्ली हे रहस्यकथांचे पुस्तकही त्यांनीच लिहीले होते. कणेकरी , नट बोलट बोलपट, शिरीषासन , पुन्हा शिरीषासन, फिल्लमबाजी, शिणेमा डॉट कॉम हे तसेच ललितलेखनही खूप गाजलं. आंबटचिंबट, इरसालती, एकला बोलो रे, कट्टा, गोतावळा, चर्पटपंजरी, चहाटळकी, चापटपोळी, डॉ. कणेकरांचा मुलगा, फटकेबाजी, नानकटाई ही त्यांपैकीच काही गाजलेली लेखन आहे.