बाळासाहेब ठाकरेंबाबत अवमानकारक विधान : आमदार भरत गोगावलेंच्या फोटोला काळे फासले

Santosh Gaikwad December 20, 2023 05:39 PM


मुंबई, दि. २०ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी (ठाकरे) आमदार भरत गोगावले यांच्या निषेधार्थ फोटोला काळे फासत जोडे मारो आंदोलन केले. शिवसेनेचे (ठाकरे) दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तसेच गोगावलेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी केली.  



शिवसेनेत फूट पडल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या भावना काय असतील, असा प्रश्न गोगावले यांना विचारण्यात आला होता. यावर वर जाऊन विचारावे लागेल किंवा तुमच्या सारख्या कुणाला तरी वर पाठवावे लागेल, असे उर्मट उत्तर देत, बाळासाहेबांचा अवमान केला. शिवसैनिकांनी (ठाकरे) याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बाळासाहेबांबद्दल कोणताही आदर नाही. केवळ ढोंग रचले असून केवळ मतांसाठी बाळासाहेबांचा जयघोष सुरू आहे, असा आरोप शिवसैनिकांनी यावेळी केला. तसेच दिवा शहरातील नाक्यावर गोगावले यांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. युवा अधिकारी अभिषेक ठाकूर, विधानसभा दिवाशहर संघटिका योगिता नाईक, शहर संघटिका ज्योती पाटील, उपशहर प्रमुख तेजस पोरजी, उप शहर प्रमुख वैष्णव पाटील, उपशहर संघटिका प्रियंका सावंत, विभाग प्रमुख चेतन पाटील, विभाग प्रमुख, मच्छिंद्रनाथ लाड उपशहर अधिकारी अक्षय म्हात्रे, विभाग संघटिका स्मिता जाधव, विभाग संघटिका मयुरी पोरजी, उपविभाग प्रमुख गुरुनाथ पाटील आदी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख अन्य युवासेना शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.