अपात्र आमदार सुनावणीला वेग, भाजपचा प्लॅन बी तयार ?

Santosh Gaikwad September 21, 2023 11:04 AM

 

मुंबई :  सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्र प्रकरणाच्या कारवाईला वेग दिला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार ठरल्यास भाजपने सरकार वाचवण्यासाठी प्लॅन बी तयार ठेवला असल्याची माहितीही सुत्रांकडून समजते. त्यामुळे भविष्यात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.  


विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा काढत असल्याचा आरोप करत, ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने यावर सुनावणी घेत राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून ठाकरे गट आणि शिंदे गटाला नोटीस पाठविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

   

अजित पवार मुख्यमंत्री होणार ? 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरल्यास भाजपने सरकार वाचवण्यासाठी प्लान बी तयार ठेवला आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाल्यास अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. याशिवाय भाजपाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं देखील नाव चर्चेत आहे. 


शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाली तरी, भाजपकडे विधानसभेत १०५ आमदार, अपक्ष आणि छोटे पक्ष तसेच अजित पवार यांच्या गटाचे ४० आमदार मिळून मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमताची अडचण नाही.


१६ आमदारांची तिरडी बांधलीये, फक्त हे राम म्हणायचं बाकी


ईडी आणि सीबीआयची भीतीपोटी आणि पैशांपोटी अनेक आमदार भाजपसोबत आहेत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र होणार, याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाहीये. १६ आमदारांची राजकीय तिरडी बांधलीये, फक्त हे राम म्हणायचं बाकी आहे. असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. विधानसभा अध्यक्षांना हा निर्णय घ्यावाच लागेल अन्यथा त्यांचं नाव संसदीय राजकारणाच्या इतिहासात काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल. मुडद्यामध्ये कितीही जान फुंकण्याचा प्रयत्न केला तरी विज्ञान आणि कायदा यालाही मर्यादा आहेत, असंही सूचकपणे राऊत म्हणाले. राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.