रिक्षा, मर्सिडिज आणि पेन ...एकनाथ शिंदेची उध्दव ठाकरेंवर टीका
Santosh Gaikwad
June 19, 2023 11:35 PM
मुंबई : शिंदे गटाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन गोरगाव येथे नेस्को सेंटरमध्ये पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. रिक्षा मर्सिडीज आणि पेन सगळंच मुख्यमंत्री शिंदे यांनी काढीत आमच्या नादाला लागू नका असा इशारा ठाकरे यांना दिला.
शिंदे म्हणाले आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे पेनच नव्हता. माझ्याकडे दोन-दोन पेन आहेत. मी कुठेही सह्या करतो. गाडीत, कार्यालयात, ठाण्यात.. काम अडू नये आणि गोरगरीबांना मदत व्हावी, यासाठी हे सरकार काम करत असल्याचं शिंदे म्हणाले. मागच्या सरकाने काही केलं नाही. आमच्या सरकारने ७५ हजार कोटी रुपयांची कामे केली आहेत. याच रिक्षाने तुमच्या मर्सिडिजला खड्ड्यात घातलं आहे. आम्ही काम करत राहू, तुम्ही आरोप करीत राहा. हिंदुत्वाची ओळख आज पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरु असला तरी आमची बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना लोकांच्या हितासाठी वाट्टेल ते करेल. एक नोटीस आली तर मोदी यांच्याकडे धावत गेले असल्याचा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.
काही लोकांना रडायला लावलं होतं, पण सत्ता येते जाते एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं. पण दुसऱ्या दिवशी गळ्यातला पट्टा गायब ! सगळं गायब, तरातरा माणूस चालायला लागला. ही कोणाची करामत माहिती आहे का ? डॉ. एकनाथ शिंदेची ही करामत आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
एकनाथ शिंदेंनी यावेळी एक भावनिक प्रसंग सांगितला. माझी आई रुग्णालयात उपचार घेत होती. त्यावेळी, मी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारात व्यस्त होतो. तेवढ्यात मला डॉक्टरांचा फोन आला, डॉक्टरांचा फोन येताच मनात पाल चुकचुकली. पण, मला सांगितलं आपल्याल इथं इथं सभा घ्यायच्या आहेत, त्यावेळी मी हो म्हणत या सभा घेऊ म्हटलं, आधी ते काम केलं. त्यानंतर, दवाखान्यात जाऊन आईचं अंत्यदर्शन घेतलं, असा भावनिक प्रसंग एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितला.