मुंबई : शिवसेना (शिंदे गट) चे राज्यव्यापी महाअधिवेशन कोल्हापूर येथे शुक्रवार व शनिवार १६ व १७ फेब्रुवारी रोजी होत आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नऊ मंत्री , ४३ आमदार, १३ खासदार उपस्थित राहणार आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी व पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी हे राज्यव्यापी महाअधिवेशन अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. अधिवेशनामध्ये पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे. पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा या सत्रामध्ये घेतला जाणार आहे. तसेच या महाअधिवेशनामध्ये पक्षाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असे राजकीय ठराव मांडले जाणार आहेत आणि त्यावर विचार विनिमय व चर्चा केली जाणार आहे.
तिसऱ्या सत्रामध्ये आगामी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आपण काय तयारी केलेली आहे, आणखी काय तयारी करायला हवी, याबद्दल पक्षाचे जेष्ठ नेते सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वरिष्ठ नेते आणि पदाधिऱ्यांमध्ये खुली चर्चा या सत्रात होणार आहे. तिसऱ्या सत्राच्या समारोपानंतर संध्याकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शिवसेनेचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते संबोधित करतील.