'मोदींनी लस बनवली, मग शास्त्रज्ञ काय गवत उपटत होते ?' उध्दव ठाकरेंनी उडवली फडणवीसांची खिल्ली
Santosh Gaikwad
June 19, 2023 10:22 PM
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापनदिन सोहळा षण्मुखानंद सभागृहात पार पडला यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ दाखवत त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवली. देवेंद्र फडणवीस म्हणतात, "आज आपण सर्व याठिकाणी एकत्र बसलोय, का बसू शकलो? याकरता बसू शकलो की कोव्हिडची व्हॅक्सिन मोदींनी तयार केली'. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की कुठून यांच्या डोक्यात व्हायरस घुसलाय हेच कळत नाही. पाहा हास्यजत्रेपेक्षा जास्त लाफ्टर आम्ही घेतो. मोदींनी कोविडची लस तयार केली असेल, तर मग बाकीचे काय गवत उपटत बसले होते का? संशोधक गवत उपटत होते का ? हे असे सगळे अंधभक्त म्हटल्यानंतर आणि त्यांचे हे असे गुरु म्हटल्यानंतर खरोखर यांना कोणतं व्हॅक्सिन द्यायचं हे ठरवावं लागेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला
उद्धव ठाकरे म्हणाले, मी आत्ता हास्य जत्रेत्या कलाकारांना भेटलो, त्यांना म्हटलं तुम्ही खरोखरच आम्हाला हसवण्याचे काम करता. काही वेळा तर आम्ही राजकारणीच आमच्या भाषणातून लोकांना हसवत असतो. आमची हास्यजत्रा चालूच असते. काल या राजकारणातल्या हास्यजत्रेचा एक प्रयोग देवेंद्र फडणवीसांनी साजरा केला. नुसतं एवढं बोलल्याने तुम्ही हसताय, त्याने केलेला प्रयोग सांगितला तर तुम्ही आणखी हसाल, असे ते म्हणाले. या सगळ्या मानसिक रुग्णांना सपुपदेशनासाठी समीर चौगुलेंच्या दवाखान्यात पाठवलं पाहिजे. हे सगळे अवली आहेत. एकापेक्षा एक अवली आहेत. लवली कुणीच नाही. पण त्यांना हेही सांगायला पाहिजे की, तुम्ही अवली असला तरी जनता आता कावली आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरें टोलेबाजी केली.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की. मणिपूर पेटलं असताना आपले पंतप्रधान अमेरिकेत चालले आहेत. हे बोलल्यानंतर नवगुलाम बोलले, सूर्यावरती थूंकू नका. मग ते जर सूर्य असतील तर मणिपूरमध्ये प्रकाश का पाडत नाही? मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही. एका रिटायर्ड अधिकाऱ्याने सांगितलं की मणिपूरमध्ये लिबियासारखी परिस्थिती झाली आहे. त्या ठिकाणी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे घर जाळलं जात असताना भाजपचे नेते तिकडे जात नाहीत.
ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गारद्यांची टोळी असं म्हटलं,आज आपल्या शिवसेनेला ५७ वर्षे झाले आहेत. ५७ वर्षांपूर्वी होता तसाच जोश जल्लोष, ताकद, हिंमत ही जशीच्या तशी आहे. इकडे शिवसैनिकांची गर्दी आहे. सभागृह गच्च भरलं आहे आणि कुणीही उठून जात नाहीए. कारण ही कडवट निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी आहे. जसे इकडे शिवसैनिक आहेत तसे आपल्या शहरातल्या एका कोपऱ्यामध्ये गारदी जमलेले (शिंदे गट) आहेत. मुद्दाम मी गर्दी आणि गारदी, असा हास्य जत्रेतला पंच मारलेला नाही. इकडे गर्दी आहे तर तिकडे गारदी (गारद्यांची टोळी म्हणजे पेशवे काळात गोंधळ घालणारी आणि वसूली करण्यासाठी ठेवलेली टोळी ) आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.