.. होय मी आंतकवादीच : उद्धव ठाकरेंनी भाजपला ठणकावले !
Santosh Gaikwad
June 20, 2024 12:09 PM
मुंबई, दि. १९ः देशातील लोकशाही, संविधान वाचवणे हे जर आंतकवाद असेल तर होय मी आंतकवादी आहे, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून भाजपला ठणकावले. भाजप आणि मोदींचे हिंदुत्व नकली आहे. शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून त्यांनी नक्षलवाद लादला. परंतु, षंढ नसाल आणि तुमच्यात हिंमत असेल तर सगळ्या यंत्रणा बाजूला ठेवून सामना करा, असे थेट आव्हान ठाकरेंनी यावेळी दिले. मनसे प्रमुख राज ठाकरे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे शैलीत खरपूस समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा विधानसभेत वचपा काढणार असल्याचा इशारा ठाकरेंनी यावेळी दिला.
ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतरचा हा आनंदाचा क्षण आहे. शिवसेनेत नवचैतन्य आणि तरूणाई सामील होत असल्याने वर्ष मोजत नाही, असे सांगत भाषणाला सुरुवात केली. निवडणुकीत जाती-धर्माच्या देशभक्तांनी मतदान केल्याप्रकरणी सर्वांचे आभार मानले. रन झाल्यानंतर ज्या बॅट्समनला पाठवतात तशी माझी अवस्था झाल्याचे सांगत, विजयी खासदार आणि लढाऊ उमेदवारांचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचे मानकरी जनता असल्याचे म्हटले. बाळासाहेबांनी आत्मविश्वास आणि अहंकार या दोन गोष्टींचे कानमंत्र दिल्याची आठवण करून दिली. मोदींमध्ये अहंकार ठासून भरला होता. महाराष्ट्रातील जनतेने तो उतरवला, अशा शब्दांत टीकेची झोड उठवली.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार तडाखा बसला आहे. त्यामुळे अपयश झाकण्यासाठी निवडणूक झाल्यानंतर ठाकरे पुन्हा एनडीएबरोबर जाणार, अशा वावड्या उठवल्या. छगन भुजबळ शिवसेनेत (ठाकरे) येणार अशी चर्चा सुरू करून जनतेत गैरसमज पसरवला. परंतु, माझा पक्ष चिन्ह चोरले. शिवसेना संपवायला निघाले. बाळासाहेबांचा नकली मुलगा असल्याची जहरी टीका अशा भाजप आणि मोदीं सोबत कदापि जाणार नाही, असे ठाकरेंनी ठणकावले. शिवसेनेने (ठाकरे) कधीही हिंदुत्व सोडलेले नाही. उलट देशातील लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी लढाई दिली. हिंदू, मुस्लिक, दलित, बौध्द, शिख, ख्रिश्चन आदी सर्व देशभक्तांनी संविधान वाचविण्यासाठी मतदान केले. सर्वांनी इंडियाला मतदान केले. त्यामुळे लोकशाही, संविधान वाचवणे आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे, असे ठाकरे गरजले. शिंदेंची शिवसेना आणि भाजपवर हल्लाबोल केला. देशात एनडीए सरकार अस्थिर असून लवकरच मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता ठाकरेंनी व्यक्त केली. राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने नियुक्त केलेल्या प्रभारी अश्वनी वैष्णव, भूपेंद्र यादव यांच्यावरही ठाकरेंनी जोरदार प्रहार केला.
देशभक्ती शिकवू नका
देशातली लोकशाही वाचवण्यासाठी हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजप करत असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजपाने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. २०१४ आणि २०१९ मधील हिंदुत्ववादी पक्ष भाजपसोबत नाहीत. चंद्राबाबू आणि नितीश कुमार सारखे हिंदुत्ववादी भाजपसोबत आहेत. चंद्राबाबू आणि नितीश कुमारांनी मुस्लीम समाजाला वचने दिली आहेत. भाजपचे हे हिंदुत्व आहे का? असा सवाल ठाकरेंनी विचारला. शिवसेनेला (ठाकरे) भाजपकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. आजोबा प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व शिकवले. आम्हाला गोमुत्रधारी, जानवेधारी हिंदुत्व कदापि मान्य नाही, असा हल्ला चढवला.
राज, प्रकाश आंबेडकर, फडणवीस निशाण्यावर
उद्धव ठाकरे यांनी भाषणात राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता, जोरदार निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे नकोत म्हणून भाजपला बिनशर्ट पाठिंबा दिला म्हणजे, उघडा पाठिंबा दिला का, अशी खिल्ली उडवली. तसेच या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे समजल्याचे ठाकरे म्हणाले. भाजप विरोधात लढण्याचा कांगावा करणाऱ्या वंचितने ही त्यांना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचे ठाकरे म्हणाले. पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना या निवडणुकीनंतर जाऊ द्या ना घरी, वाजवले की बारा असा खोचक टोला फडणवीस यांना लगावला.
---