विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री भेटीवर आक्षेप शिवसेनेची (ठाकरे) सर्वोच्च न्यायालयात याचिका

Santosh Gaikwad January 10, 2024 12:20 AM


मुंबई, दि. ९ः 
आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली भेट संशयास्पद असल्याचा ठपका शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठेवला. तसेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केल्याची माहिती मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 'न्यायमूर्ती आरोपीला भेटले, असा एकंदरीत प्रकार आहे' असे सांगत ठाकरेंनी या भेटीवर सडकून टीका केली.

आमदार अपात्रतेचा निकाल दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या. ठाकरेंनी देखील यावरून हल्लाबोल केला. विधानसभा अध्यक्ष सध्या न्यायमूर्तींच्या भूमिकेत आहेत. अशा स्थितीत अध्यक्षांनी दोन वेळा मुख्यमंत्र्यांची निवासस्थानी भेटणार असतील तर त्या न्यायाधीशांकडून न्यायाची काय अपेक्षा ठेवायची? असा सवाल करत नार्वेकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. अध्यक्षांनी या प्रकरणात सतत वेळकाढूपणा केला. ३० डिसेंबर ऐवजी १० जानेवारीची न्यायालयाकडून मुदत मागितली. परंतु, त्यापूर्वीच न्यायाधीश आरोपी बंद दाराआड चर्चा केली. हे प्रकरण हाताळण्याच्या पद्धतीवरून लोकशाहीचा खून होतो की काय, अशी चिन्ह दिसत आहेत, असा हल्लाबोल केला. देशातील लोकशाही जिवंत राहणार की नाही, हे ठरवणारा हा निकाल आहे, असे ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्यापूर्वी दिलेल्या निर्देशाची ठाकरेंनी यावेळी आठवण करून दिली. आमदार अनिल परब यांना न्यायालयाने दिलेला निकाल वाचून दाखवायला सांगितले.

मुख्यमंत्र्यांना भेटण्यास हरकत नाही. परंतु, आमदार अपात्रतेचा निकाल दोन दिवसांवर आला असताना अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने सांशकता निर्माण झाली आहे. एका आरोपीला भेटण्यासाठी न्यायाधीष केल्याचा हा प्रकार आहे. अध्यक्षांनी नि:पक्षपातीपणे काम करणे आवश्यक आहे. मात्र, अध्यक्षांचे सध्याचे कामकाज बेजबाबदारपणाचे असून निर्णय प्रक्रियेतील त्याच्या निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे, असे शिवसेनेने (ठाकरे) सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे.

सहानुभूतीवर राजकारण करत नाही

बिलकीस बानो प्रकरणावरून जोरदार निशाणा साधला. हा कोणाचा वैयक्तिक खटला नाही. जुलमी अत्याचार करणाऱ्यांचा अंत करायला हवा. ही शिकवण देणाऱ्या रामाचे मंदिर उभे राहत आहे. त्यामुळे या जुलमी राजवटीचा अंत जनता करेल. मी सहानभूतीवर राजकारण करणारा नाही, न्यायावरती राजकारण करणारा आहे. जुलूम शहांचा नि:पात जनता करणार. ही माझी लढाई नाही, जनतेच्या भवितव्याची लढाई आहे. रामाची शिकवण घेऊन अत्याचाराचा आणि जुलूमशाहीचा अंत आपल्याला करावा लागेल, असे ठाकरे म्हणाले.