मुंबई, दि. १५ः विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात शिवसेनेने (ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अध्यक्षांनी न्यायालयाचाच अवमान केल्याची याचिका दाखल केली आहे. देशातील लोकशाही, संविधान टिकवणे आता आपल्या हाती आहे. त्यामुळे यावर योग्य तो निर्णय व्हावा, अशी विनंती केली आहे. न्यायालय आता यावर कोणता निर्णय देणार, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर १० जानेवारी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देत, ठाकरेंना जोरदार धक्का दिला. न्यायालयाने अवैध ठरवलेल्या भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती ग्राह्य धरली. तसेच शिवसेनेच्या १९९९ सालच्या घटनेचा दाखला देत, शिंदे यांची खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. ज्यांचा विधीमंडळ पक्ष, त्यांचाच मूळ पक्ष असल्याचे सांगत आमदारांना अपात्र करण्यास नकार दिला. अध्यक्षांच्या निकालाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेकडून (ठाकरे) ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने सुरू आहेत. आता शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन निकालाला आव्हान दिले आहे. अध्यक्षांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे याचिकेत नमूद केले आहे. अध्यक्षांच्या निकालपत्राचा संपूर्ण तपशील याचिकेत जोडला असून लवकरच सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.