मुंबईत सहापैकी तीन जागेवर, शिवसेना विरूध्द शिवसेना थेट सामना !

Santosh Gaikwad May 02, 2024 12:00 AM


मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे देशभरातील मतदारसंघात वातावरण तापलं आहे. मुंबईत महायुतीमध्ये काही जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघाचे सर्व पक्षांचे उमेदवार घोषीत झाले आहेत. या निवडणुकीत महायुती विरूध्द महाआघाडी असा सामना होणार असला तरी सुध्दा मुंबईच्या सहापैकी तीन मतदार संघात  शिवसेना ठाकरे गट विरूध्द  शिवसेना शिंदे गट अशी सरळ लढत होणार आहे. 

महाविकास आघाडीकडून ठाकरे गट २१ जागा, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी शरद पवार गट १० जागा लढवत आहे. तर महायुतीमध्ये भाजप २८ जागा, शिंदे गट १५ आणि अजित पवार गट ४ जागा लढवणार असल्याची माहिती हाती आली आहे. मुंबईतील उमेदवार जाहीर झाल्यानंतर दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपांचा फॉर्म्युला फायनल झाला आहे.


१ उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ 

भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे गोयल हे महायुतीचे उमेदवार आहेत तर काँग्रेसचने भूषण पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात भाजप  विरूध्द काँग्रेस असा सामना रंगणार आहे. 

  उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ

या मतदार संघातून भाजपने आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने संजय पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पाटील हे आधी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना फुटीनंतर त्यांनी ठाकरे गटाला साथ दिली. ते २००४ साली भांडूपचे आमदार होते. २००९ मध्ये ईशान्य मुंबईतून खासदार झाले होते. त्यामुळे ईशान्य मुंबईत भाजप विरूध्द ठाकरे गट अशी लढत होणार आहे. 

३ उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ

या मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने अमेाल किर्तीकर यांना रिंगणात उतरवले आहे. कीर्तिकर हे युवासेनेचे सेक्रेटरी आहेत. तसेच ते विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र आहेत.  शिंदे गटाने जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय ओळख असलेले रवींद्र वायकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे वायव्य मुंबई लोकसभा मतदार संघात शिंदे गट विरूध्द ठाकरे गट अशी सरळ लढत होणार आहे. 

४ उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

या मतदार संघात काँग्रेसने माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. वर्षा गायकवाड यांनी चार वेळा विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. त्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छूक होत्या. मात्र, काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभातून उमेदवारी मिळाली. भाजपने या लोकसभा मतदारसंघातून पूनम महाजन यांचा पत्ता कट करीत  माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे काँग्रेस विरूध्द भाजप असा थेट सामना रंगणार आहे. 

 ५  दक्षिण मध्य मुंबई मतदार संघ 

या मतदार संघातून ठाकरे गटाने अनिल देसाई यांना रिंगणात उतरवले आहे. अनिल देसाई हे राज्यसभा खासदार आहेत. राहुल शेवाळे हे महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार आहेत. शेवाळे हे मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बाजी मारत खासदार झाले. त्यामुळे या मतदार संघात ठाकरे विरूद शिंदे गट अशी चुरशीची लढत होणार आहे. 

६ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

या मतदार संघातून महाविकास आघाडीकडून  ठाकरे गटाने अरविंद सावंत यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे अरविंद सावंत हे २०१४ साली लोकसभा निवडणुकीत जिंकले. त्यांनी केंद्रीय मंत्रिपद देखील भुषवलं. शिवसेना फुटीनंतर त्यांनी ठाकरे गटाला साथ दिली. तर महायुतीकडून शिंदे गटाच्या यामिनी जाधव या रिगणात उतरल्या आहेत. या भायखळा लोकसभा मतदारसंघातील आमदार आहेत. शिवसेना फुटीत त्यांनी शिंदे गटाला साथ दिली. त्यामुळे ठाकरे विरूध्द शिंदे गट असा सामना हेाणार आहे.