शिवसेना (ठाकरे) लोकसभेच्या २३ जागा लढवणार, काँग्रेस नेत्यांशी आमचे घनिष्ठ संबंध संजय राऊत यांचा दावा

Santosh Gaikwad December 22, 2023 06:07 PM


मुंबई, दि. २२ः आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) २३ जागा लढविणार आहोत, असे कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना स्पष्टपणे सांगितल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून जागा वाटपाबाबत निर्णय होईल, असे राऊत यांनी सांगितले. काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राऊत यांचा दावा फेटाळून लावला. त्यामुळे आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.


काँग्रेस नेत्यांकडून जागावाटपाबाबत विविध दावे केले जात असल्याबाबत प्रसार माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. काँग्रेसने महाराष्ट्रातील ४८ जागा लढवाव्यात, त्याबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही. ती बातमी कोणी दिली माहित नाही, पण आमची काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बैठक झाली. कदाचित यासंदर्भात महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना माहित नाही. उद्धव ठाकरे जेव्हा दिल्लीत आले तेव्हा सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत अर्धा तास महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर चर्चा केली. आपण स्वत: आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होतो, असे राऊत यांनी सांगत काँग्रेस महाराष्ट्रीतील नेत्यांना फटकारले. तसेच या चर्चेत नेमके काय घडले हे आम्हालाच माहित आहेत. महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडसोबत होईल. आम्ही २३ जागा लढवत असल्याचे दिल्लीच्या नेत्यांना स्पष्ट सांगितल्याचे राऊत म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी अंतिम टप्प्यात चर्चा केली जाईल. आंबेडकर हे महाविकास आघाडी आणि इंडियाचे घटक पक्ष असावेत, यासंदर्भात दिल्लीत आमची सविस्तर चर्चा झाल्याचे माहिती राऊत यांनी सांगितले.


जागावाटपाचा निर्णय हायकमांड घेईल - वडेट्टीवार


राऊत यांचा दावा काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र फेटाळून लावला. कोण किती जागा लढणार, हा वादाचा विषय होऊ शकत नाही. ज्याची जिथे ताकद आहे, तो पक्ष ती जागा लढवेल. जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली नसली तरी हा निर्णय आमचे हायकमांड घेतील. त्यामुळे संख्येचा प्रश्न आला कुठे? असा सवाल करत काहीतरी वावड्या उठवून आपापसांत भांडण लावायचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.