शिवसेनेच्या त्याच जागा लढणार : मंत्री उदय सामंत यांचा दावा

Santosh Gaikwad February 29, 2024 07:31 PM


मुंबई, दि. २९ ः मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या. येत्या निवडणुकीत त्याच जागा लढणार, असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान भवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. दरम्यान, महायुतीत मुख्यमंत्र्यांकडे जागा वाटपाचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय शिवसेनेसाठी (शिंदे) अंतिम असेल, असे सामंत म्हणाले. 

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून राजकीय पक्षांत धुसफूस वाढली आहे. महायुतीत भाजप मोठा पक्ष असल्याने सर्वाधिक जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. भाजपकडून शिवसेनेच्या (शिंदे) अनेक जागांवर दावा सुरू आहे. आता रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपने दावा केला. गोव्याचे मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघात आले होते. शिवसेनेचे इच्छुकांकडून याला विरोध होतो आहेत. मंत्री सामंत यांचे बंधु किरण (भैय्या) सामंत येथे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. महायुतीत त्यामुळे धुसफूस वाढली आहे. मंत्री सामंत यावर खुलासा केला. 

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जागा शिवसेनेने जिंकली आहे. मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हीच जागा लढण्याची आमची इच्छा आहे. इतकेच नव्हे तर शिवसेनेने मागील लोकसभा निवडणुकीत २३ जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत त्याच जागा आम्ही लढणार आहोत, असे सामंत म्हणाले. मुख्यमंत्र्यांना जागावाटपाचा निर्णय घेण्याचे सर्वाधिक अधिकार दिले आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला अंतिम असेल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास होत आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास वाढतो आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे ४५ जागा निवडून आणू, असे म्हटल्याचे सामंत म्हणाले.