मुंबई: यंदाची डीएसओ राज्य सबज्युनियर कॅरम स्पर्धा विजेती व राष्ट्रीय ख्यातीची कॅरमपटू सिमरन शिंदेने कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १६ वर्षाखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धा जिंकली. अंतिम फेरीत सिमरन शिंदेने अचूक खेळासह सातत्याने राणीवर कब्जा मिळवित उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्ना गोळेचे आव्हान २४-१ असे संपुष्टात आणले आणि तिने विजेतेपद हासील केले. आक्रमक खेळाने सुरुवातीचा बोर्ड खिशात टाकूनही प्रसन्ना गोळेला अखेर अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, पंच चंद्रकांत करंगुटकर व अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती मोफत कॅरम स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर, ठाणे पालघर आदी जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटूसह ४८ खेळाडूंनी दर्जेदार खेळ केला. उपांत्य फेरीत प्रसन्ना गोळेने प्रसाद मानेचा १३-२ असा तर सिमरन शिंदेने रुद्र गवारेचा १३-४ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली. परिणामी प्रसाद माने व रुद्र गवारे यांनी उपांत्य उपविजेतेपदाचा पुरस्कार पटकाविला. राष्ट्रीय ख्यातीचे सबज्युनियर कॅरमपटू ध्रुव भालेराव, सार्थक केरकर, अमेय जंगम, देविका जोशी यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार मिळविला. शालेय खेळाडूंच्या पालकवर्गाने दर्जेदार मोफत कॅरम स्पर्धा आयोजित केल्याबद्दल राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांना धन्यवाद दिले.
******************************