एमआरव्हीसीतर्फे १३५ कोटींचा निधी, चिखलोली रेल्वे स्थानक, कल्याण-बदलापूर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला वेग !
Santosh Gaikwad
April 28, 2023 05:25 PM
कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा व चौथा रेल्वेमार्ग आणि चिखलोली येथील नियोजित रेल्वे स्थानक व परिसरातील जमिनी देणाऱ्या शेतकरी व भूखंडमालकांसाठी मुंबई रेलवे विकास कॉर्पोरेशन लि.ने (एमआरव्हीसी) सुमारे १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उल्हासनगर येथील प्रांत अधिकाऱ्यांकडे निधी वर्ग करण्यात आल्यामुळे, रेल्वेच्या कामांना वेग येणार आहे अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.
कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा व चौथा रेल्वेमार्गासाठी कुळगाव, मोरिवली, चिखलोली, खुंटवली, कात्रप आणि बेलवली येथील शेतकरी व भूखंडमालकांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. तर अंबरनाथ-चिखलोली दरम्यान उभारण्यात येणाऱ्या चिखलोली रेल्वेस्थानकासाठी स्थानकाच्या परिसरातील जमीन अधिग्रहीत करण्यात आली होती. या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता. या संदर्भात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून पाठपुरावा केला जात होता. या संदर्भात त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, `एमआरव्हीसी'ने चिखलोली स्थानक व परिसरातील जमिनीसाठी ८९ कोटी ४३ लाख, तर कल्याण-बदलापूरदरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गासाठी ४५ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उल्हासनगर येथील प्रांत (उपविभागीय अधिकारी) यांच्याकडे निधी पाठविण्यात आला आहे. यासाठी राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आलं आहे.