सप्तश्रृंगी घाटात बसचा भीषण अपघात, मृत महिलेच्या वारसाला दहा लाखाची मदत : जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Santosh Gaikwad July 12, 2023 05:58 PM


मुंबई, दि. १२ : नाशिकमधील कळवण येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.


खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर बसमधून प्रवास करणारे २२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. 


सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळल्याची माहिती आहे. आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. बस क्रमांक MH 40 AQ 6259 वर ड्रायव्हर गजानन टपके, कंडक्टर पुरुषोत्तम टिकार कर्तव्यावर होते. अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


दरम्यानबचावपथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.  पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

-----