हिंमत असेल तर बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले थांबवा : उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा

Santosh Gaikwad August 07, 2024 10:17 PM

 
नवी दिल्ली:  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे  सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते देशभरातल्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. बांगलादेशमधील हिंदूचे संरक्षण करणे नरेंद्र मोदी यांचे काम आहे. बांगलादेशमधील हिंदूवर हल्ले होत असतील तर केंद्र सरकारने पावले उचलावी. शेख हसीना यांना आश्रय देत असतील तर त्या ठिकाणी असलेल्या हिंदूचे संरक्षण करणे तुमचे काम आहे. बांगलादेशमधील हिंदूवर होणारे अत्याचार रोखून दाखवावे असे आवाहन ठाकरे यांनी केले. 
 
 उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात असलेल्या महायुतीला सत्तेतून  फेकून देण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे. आगामी निवडणुकीत महायुतीची सत्ता आम्ही उलथवून लावू असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवाय आमच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे अनेक चेहरे आहेत. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र बसून कोण मुख्यमंत्री असेल ते सत्ता आल्यानंतर ठरवू  असेही ते म्हणाले.  धारावीच्या मुद्यावरुन पुन्हा अदानी यांना टीकेचे लक्ष्य केले. जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू, मुंबईची विल्हेवाट कोणाला लावू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेनेत फुट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदें बरोबर जवळपास चाळीस आमदार गेले. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यातल्या अनेक आमदारांमध्ये चलबिचल आहे. अशात त्या आमदारांना पुन्हा शिवसेना ठाकरे गटात घेणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर सर्वांनाच चक्रावून टाकणारे उत्तर उद्धव यांनी दिले. त्या गटात राहून जर ते मला मदत करणार असतील तर काय हरकत  आहे. आम्ही त्यांना सध्या तपासून पाहात आहोत असे ठाकरे म्हणाले. त्यामुळे शिंदे गटातील काही आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचे संकेत ठाकरे यांनी दिले आहेत. शिवाय ते खबरीचे काम करत असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवले आहे. त्यामुळे शिंदेंचे टेन्शन मात्र वाढणार आहे.

सांगलीत मनोमिलन 

सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे हे विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर नाराज होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरही ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते दोघेही भेटले. विशाल, विश्वजित आणि चंद्रहार हे तरूण नेते आहेत. त्या निवडणुकीत काही तरी चुकीचे झाले आहे. पण आम्ही भाजपला तिथे हरवले हे महत्वाचे आहे. असे काही चुकीचे विधानसभा निवडणुकीत होणार नाही अशी ग्वाही आता त्या दोन्ही नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर  दुख धरून बसण्यात काही अर्थ नाही. विधानसभेला आम्ही एकत्रीत निवडणूक लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.    
***