माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांचे निधन

Santosh sakpal April 06, 2023 01:21 PM

मुंबई: – भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू, सलामीवीर सुधीर नाईक यांचे मुंबईत वयाच्या ७८व्या वर्षी निधन झाले. दादर येथील आपल्या निवासस्थानी २५ मार्च रोजी स्नानगृहात पडल्यामुळे त्यांच्या मेंदूला इजा झाली होती. हिंदुजा इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांना ते उत्तम प्रतिसादही देत होते. मात्र आज अचानक त्यांनना श्वसनाचा व उच्च रक्तदाबाचा त्रास झाला आणि त्यांची झुंज संपुष्टात आली. सुप्रसिद्ध साहित्यिका वसुंधरा पेंडसे-नाईक यांचे ते पती होते. त्यांच्या पश्चात, मुलगी राधिका, जावई आशुतोष देशपांडे आणि नात असा परिवार आहे.

   सुधीर नाईक यांचा क्रिकेट मित्रपरिवार मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या मुलीने व जावई आशुतोष देशपांडे यांनी अत्यंसंस्कार गुरूवारी सकाळी १०.०० वाजता दादर येथील वैकुंठभूमीत करण्यात येतील असे कळविले आहे. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव दर्शनासाठी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

   सुधीर नाईक यांच्या क्रिकेट कारकिर्दीप्रमाणेच त्यांनी क्रिकेट मैदानाचे क्युरेटर म्हणूनही कारकिर्द गाजली. त्यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर म्हणून जवळजवळ दोन दशके काम पाहिले. १९९६ च्या व २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्‌टी सज्ज केली होती. क्रिकेटमधील एक उच्चशिक्षित क्रिकेटपटू अशी त्यांची ओळख होती. ते एम एस्सी होते, पी एच डी करीत होते. त्यांनी निवृत्तीनंतर नॅशनल क्रिकेट क्लब या मैदान क्लबच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम क्रिकेटपटू घडविले. त्यामध्ये कसोटी खेळलेल्या झहीर खान, वासिम जाफर, निलेश कुलकर्णी आणि रणजीपटू सुनील मोरे, राजेश पवार, मनिष पटेल, अमित दाणी, अतुल रानडे आदींचा समावेश आहे.

   सुधीर नाईक यांच्या नेतृत्त्वगुणाचेही कौतुक केले जायचे. १९७४ साली त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटीत इंग्लंडमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या पहिल्याच डावात त्यांनी झुंजार ७२ धावा केल्या होत्या.

     मुंबईचे सर्व प्रमुख क्रिकेटपटू १९७१ च्या सुमारास भारतीय संघातर्फे खेळण्यासाठी दौऱ्यावर गेले असताना त्यांनी नवोदित खेळाडूंना घेऊन मुंबईला रणजी विजेतेपद मिळवून देण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वगुणाचेही त्यावेळी कौतुक झाले होते. रणजी क्रिकेटस्पर्धेत ८५ सामन्यात त्यांनी ४३७६ धावा फटकाविल्या होत्या. त्यामध्ये बडोदे संघाविरुद्ध झळकाविलेल्या नाबाद द्विशतकाचाही समावेश होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारीणीवरही त्यांनी काम करून आपली छाप टाकली होती.