महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार ? सुनील तटकरे यांची माहिती
Santosh Gaikwad
May 25, 2024 07:18 PM
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर २७ मे रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक गरवारे क्लब हाऊसमध्ये होणार आहे. या बैठकीतसंदर्भात माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या बैठकीला महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. देशाच्या, राज्याच्या, पक्षाच्या, राजकारणाला कलाटणी देणारा हा प्रवेश होणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्रात दोन पक्ष फुटल्यानंतर पून्हा राजकीय भूकंप होणार का ? अशी चर्चा रंगली आहे.
तटकरे म्हणाले की, आम्ही राज्यात स्पष्टपणाचे धोरण घेऊन 'एकच लक्ष, विधानसभा क्षेत्र' हे सुत्र घेऊन काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ४ जूनच्या निकालाची फारशी वाट न बघता राज्यभरात पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी आणि संघटना अधिक गतीमान करण्यासाठी विधानसभा क्षेत्रानुसार जिल्हानिहाय आढावा घेऊन पावले उचलली जात असल्याची माहिती तटकरे यांन दिली. २७ मे रोजी होणा-या बैठकीला राष्ट्रीय नेते अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मंत्री, आमदार, पक्षाचे लोकसभा उमेदवार, सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. १० जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन असून त्यानुसार मुंबई, दिल्ली याठिकाणी कार्यक्रम करण्याची तयारी व नियोजन होणार्या बैठकीत कोअर कमिटीच्या ग्रुपमध्ये चर्चा केली जाणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिक सक्रियदृष्ट्या दक्ष राहून अधिक ग्रामस्तर ते राज्यपातळीवर काम करण्याचे नियोजन करत आहे. परवा होणार्या पक्ष प्रवेशानंतर देशभरात आणि राज्यभरात ताकद अधिक वाढली जाईल असा विश्वास व्यक्त करतानाच त्याचा फार मोठा परिणाम आगामी निवडणुकीत होऊ शकतो असा दावा सुनिल तटकरे यांनी केला.
प्रत्येकाचे ४ जूनला लागणार्या निकालाकडे लक्ष आहे. देशात काय होणार, राज्यात काय होणार... राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण विधानसभा मतदारसंघात काय होणार, पारावर, गल्लीत, चौकात काय होणार याचीच चर्चा आहे. एकंदरीत जनतेचा कौल महायुतीला मिळेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यात तीव्र पाणी टंचाई आहे. दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मराठवाड्यात बैठक घेतली. गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे ज्याठिकाणी पाणीटंचाई तीव्रतेने भासते आहे त्याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करत किंवा अन्य उपाययोजना करुन जनतेला उपलब्ध होईल यादृष्टीने राज्यसरकारने उपाययोजना कराव्यात. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. काजू बागायतदारांचे नुकसान झाले आहे. खरीपाची पिके हातातोंडाशी आली होती त्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता सुरू आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीमध्ये लागू असलेली आचारसंहिता शिथील करावी अशी विनंती राज्यसरकारकडे केली आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
*****