मुंबई : बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना हे निर्देश दिले.
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत भरारी पथके तयार करून बियाणे विक्रीवर लक्ष ठेवावे. बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकताहेत की नाही ते तपासावे. बोगस बियाणे विक्री करताना आढळल्यास अशांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता काटेकोर कारवाई करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशात म्हटले आहे.
बोगस बियाणामुळे दुपार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले होते. त्यामुळे या संदर्भात कायदा करण्याची किंवा कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. मागील आठवडयात अकोला येथील कार्यक्रमासाठी कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी शेतक-यांना बोगस बियाणे, खतांचे विक्री करणा-यांना दहा वर्ष शिक्षेची तरतूद करण्यासाठी आगामी काळातील अधिवेशनात कायदा करणार असल्याची घोषणा केली होती. आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोगस बियाणे विक्रीसंदर्भात चर्चा झाली त्यावेळी मुख्यमंत्रयांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.