देखण्या कलाविष्कारसह फुलवंती चित्रपटाचा टिझर भेटीला
Santosh Sakpal
September 22, 2024 08:22 PM
मुंबई /शिवनेर/सिने वार्तांहर/संतोष सकपाळ
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली 'फुलवंती' ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर ११ ऑक्टोबरला अवतरणार आहे. त्याआधी चित्रपटाचा देखणा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचे अप्रतिम सेट्स, उच्च तांत्रिकमूल्ये, दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्याला तेवढ्याच धारदार संवादाची सोबत अशा भव्यतेने येणारा ‘फुलवंती’ हा देखणा चित्रपट रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार आहे.
पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा असलेली आणि देखण्या कलाविष्काराने सजलेली फुलवंती मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य, अविस्मरणीय कलाकृती ठरेल.
पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत... ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. अविनाश- विश्वजीत यांनी संगीताची धूरा सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी,प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. तर अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी,रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.