ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर शिंदे गटाच्या वाटेवर !
Santosh Gaikwad
March 07, 2024 11:18 AM
मुंबई : ईडी पिडा मागे लागल्याने आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या आठवडाभरात वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
रवींद्र वायकर यांच्यामागे जोगेश्वरीतील जागेवरुन ईडीचा ससेमिरा लागला आहे. जोगेश्वरीमधील राखीव भूखंडावर वायकरांनी पंचतारांकित हॉटेल उभे केल्याचा आरोप आहे. यातून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला असल्याचा आरोप करत ईडीने त्यांची सखोल चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी एकटे आमदार वायकरच अडकलेले नाहीत तर त्यांच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल आहे. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षही होते. मुंबई महापालिकेला शिवसेना ठाकरे गट आपली तिजोरी समजत होता, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला होता. ठाकरे आणि वायकर कुटुंबियांनी रायगड जिल्ह्यात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचाही आरोप सोमय्यांनी केला होता. जोगेश्वरीतील राखीव भूखंड अपहार प्रकरण आणि रायगडमधील बेहिशोबी मालमत्तेमुळे वायकर ईडीच्या रडारवर आले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून दबाव आणल्या जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत वारंवार करत आले आहेत.