ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर शिंदेच्या सोबत
Santosh Gaikwad
March 10, 2024 09:31 PM
मुंबई : शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांनी आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर त्यांना पक्षप्रवेश दिला. गेल्या काही दिवसांपासून वायकरंच्या मागे ईडीचा सिसेमिरा सुरू होता त्यामुळेच ईडाचा वेढा सोडविण्यासाठी वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वतुळात सुरू आहे.
आमदार वायकर हे उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. कालच ते ठाकरेंबरोबर एका कार्यक्रमात व्यासपीठावर हेाते मात्र आज त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. आमदार रवींद्र वायकरांनी पंचतारांकित हॉटेल बांधताना 500 कोटींचा घोटाळा केला असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. सोमय्यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. पुढे हे प्रकरण अंमलबजावणी संचलनालयाकडे (ईडी) वर्ग करण्यात आले. ईडीने वायकर यांच्या विरोधात मनी लाँडरिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. तेव्हापासून वायकर हे ईडीच्या रडारवर आले आहेत. ईडीने वायकर यांचे निवासस्थान आणि त्यांच्याशी संबंधित सहा ठिकाणी एकाच वेळी छापे घातले होते. मात्र वायकरांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने अखेर वायकरांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार वायकर म्हणाले की, आपल्या मतदारसंघातील अनेक प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. “आरेतील 45 किलोमीटर रस्त्यासाठी मला 173 कोटी रुपये पाहिजे आहेत. आरेतील रस्ते होणे गरजेच आहे, तेथील नागरिकांचीही तशी आग्राहाची मागणी आहे. तसेच, रॉयल फार्म परिसरात पाण्याची व्यवस्था योग्य नाही. त्यामुळे नागरिकांसाठी धोरणात्मक निर्णय बदलणे गरजेचे असते. त्यामुळे तसे निर्णय बदलले नाही तर जनतेला आपण न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे अनेक धोरणात्मक निर्णय बदलण्यासाठी इथे आलो आहे”, असेही रवींद्र वायकर यावेळी म्हणाले.
आमच्यातील संभ्रम दूर झाला : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज वायकरांनी बाळासाहेबांच्या ख-या विचारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांचे स्वागत करताे. आमच्यात तिसराच व्यक्ती गैरसमज पसरवीत होता. तो संभ्रम दूर झाला आहे. ठाकरे सरकारच्या काळात कामे झाली नाहीत ती झाली असती तर वायकर आले नसते असे शिंदे म्हणाले.
उध्दव ठाकरे म्हणाले, फरक पडत नाही
आमदार रविंद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका डागली आहे. ठाकरे म्हणाले की, एक खडा इकडचा तिकडे झाला तरी फरक पडत नाही. कुणीही इकडे तिकडे गेला तरी शिवसेनेची ताकद कमी होत नाही. हे आपले सर्व जोगेश्वरीतील कार्यकर्ते इथे आहेत. जोगेश्वरीतील कार्यकर्त्यांना स्टेजवर बोलवत उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरूवातील आमदार रवींद्र वायकर यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली.