ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर : कल्याण चा सस्पेन्स कायम !

Santosh Gaikwad March 27, 2024 10:28 AM



मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची  लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे.खासदार संजय राऊत यांनी एक्स वर यादी पोस्ट करत लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर  केले आहेत. मात्र शिंदे आणि ठाकरेंसाठी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या कल्याण लोकसभा मतदार संघाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कल्याणचा उमेदवार कोण ? हा सस्पेन्स कायम राहिला आहे. 

 खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलेल्या यादीत १७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मुंबई ठाण्यातील लोकसभा मतदार संघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.  त्यामध्ये दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर, उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबईतून - संजय दिना पाटील, दक्षिण मध्य मुंबई येथून अनिल देसाई तर ठाण्यातून राजन विचारे यांना पून्हा उमेदवारी दिली आहे. मात्र कल्याण लोकसभेचा उमेदवार अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. 

  महाआघाडीच्या जागा वाटपात कल्याण लोकसभा मतदार संघ हा ठाकरे गटाच्या वाटयाला आहे. कल्याण लोकसभा हा सर्वात प्रतिष्ठेचा मतदार संघ पाहिला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र डॉ श्रीकांत शिंदे हे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यामुळे शिंदे यांचा पराभव हेच ठाकरे यांचे ध्येय आहे. कै आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र  शिंदेंना टक्कर देण्यासाठी स्थानिक भूमिपूत्र उमेदवार असावा अशी ठाकरे गटाच्या कार्यकत्यांची मागणी आहे. श्रीकांत शिंदे यांना टक्कर देऊ शकेल अशा उमेवाराच्या शोधात ठाकरे गट आहे. ठाकरे गटाकडे तगडा उमेदवार नसल्याने काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि आगरी कोळी समाजाचे नेते संतोष केणे यांना रिंगणात उतरविण्याची खेळी ठाकरे गटाकडून खेळली जाऊ शकते. ठाकरे गटाकडून केणे यांना उमेदवारीची ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. वारकरी संप्रदायचे संतोष केणे यांना स्थानिक भूमिपुत्रांचा वारक-यांचा  मोठया प्रमाणात पाठींबा मिळू शकतो. त्यामुळे कल्याणच्या उमेदवारावर जेापर्यंत शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत तोपर्यंत इथला सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे केणे मशाल हातात घेतात का? असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. 
-----
 
ठाकरे गटाची पहिली यादी

१ दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
२ उत्तर पश्चिम मुंबई - अमोल कीर्तिकर
३ उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई - संजय दिना पाटील
४ दक्षिण मध्य मुंबई  - अनिल देसाई
५ ठाणे - राजन विचारे
६ रायगड - अनंत गिते
७ रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत*
८ मावळ - संजोग वाघेरे

९ नाशिक- राजाभाऊ वाजे
१० धाराशिव - ओमराजे निंबाळकर
११ परभणी - संजय जाधव
१२ छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
१३ हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
१४ सांगली - चंद्रहार पाटील
१५ शिर्डी  - भाऊसाहेब वाकचौरे
१६ बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
१७ यवतमाळ वाशिम  - संजय देशमुख