शिवसेनेचा आज दोन वर्धापनदिन, ठाकरे vs शिंदे गटाचे शक्तीप्रदर्शन !

Santosh Gaikwad June 19, 2023 10:35 AM


मुंबई : १९ जून शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा केला जातो.  शिवसेनेच्या फुटीनंतर यंदा प्रथमच मुंबईत शिवसेनेचे दोन वर्धापनदिन साजरे हेात आहेत. त्यामुळे वर्धापनदिनानिमित्ताने पून्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच वर्धापनदिन साजरा होत आहे. 


गेल्या वर्षी दसरा मेळावादेखील दोन झाले होते. उद्धव ठाकरे यांचा मेळावा हा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदेंचा मेळावा हा बीकेसीवर पार पडला होता. आता शिवसेनेचा वर्धापन दिनही दोन साजरे होत आहेत. ठाकरे गटाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. ठाकरे गटाकडून रविवारी पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा वर्धापन दिन हा आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. तर शिंदे गटाकडून नेस्को येथे वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ठाकरे गटातील काही पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करतील, असे सांगण्यात येत आहे.  शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या अॅड मनीषा कायंदे आणि मुंबईचे नगरसेवक विजय तांडेल यांनी शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांच्या उपस्थितीत रविवारी जाहीर प्रवेश केला.   


उद्धव ठाकरे यांच्याशी एकनाथ शिंदे  यांनी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेची सर्वच गणितं बदलून गेली आहेत. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गटाकडूनही गेल्या अनेक दिवसांपासून वर्धापन दिनाची तयारी सुरू होती. शिवसेनेचे सर्व आमदार, मंत्री त्याचबरोबर प्रतिनिधींकडून या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे. यावेळी शिंदे गटाकडून राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी रविवारी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.