ते विधान अनावधानाने : नीलम गोऱ्हेंची कबूली
Santosh Gaikwad
July 08, 2024 06:52 PM
मुंबई, दि. ८ः आमदार अनिल परब यांच्या संदर्भात केलेले अनावधानाने होते. मात्र, ते तपासून सभागृहाच्या पटलावरून काढून टाकते, अशी कबुली उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. पक्षप्रमुखांना सभागृहात कामकाज कसे करतो हे दाखविण्यासाठी आणि परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळावे, याकरिता सगळा परब यांचा खटाटोप सुरू आहे, असे विधान गोऱ्हे यांनी शुक्रवारी केले होते. परब यांनी सोमवारी विधान परिषदेत त्यावर हरकतीचा मुद्दा मांडत, संबंधित वकत्व्य पटलावरून काढून टाकण्याची मागणी केली.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक आणि उपसभापती मध्ये अनेकदा खटके उडताना दिसतात. विरोधकांना उपसभापती बोलू देत नाहीत, असा सातत्याने आरोप होतो. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या दिवशीही विरोधकांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही, असे सांगत उपसभापतींनी गळचेपी केली, असा आरोप केल्याने परब आणि गोऱ्हे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. शुक्रवारी देखील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अर्थसंकल्पावरील भाषणावेळी सभागृहात राज्य अर्थमंत्री उपस्थित नाहीत, ही बाब परब यांनी उपसभापतींच्या निदर्शनास आणून दिली. तसेच मंत्री येणार नाहीत तोपर्यंत कामकाज थांबवावे, अशी मागणी लावून धरली. दरम्यान, परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. उडालेल्या गोंधळात गोऱ्हे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखविण्यासाठी सगळा खटाटोप सुरू आहे. तसेच तुम्हाला निलंबित करेन, असे वक्तव्य केले होते.
यासंदर्भात सोमवारी अनिल परब यांनी हरकतीचा मुद्दा मांडून तीव्र नाराजी व्यक्त केली. मी काय काम करतो, हे उद्धव ठाकरेंना दाखवायची गरज नाही. त्यांच्यामुळेच चार वेळा आमदार आणि सत्ता असताना मंत्री झालो. आता तुम्हाला असे म्हणायचे का, उपसभापती पदासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना किती काम करतेय, हे दाखवायचे आहे. विरोधकांना त्यामुळे बोलू देत नाही, असे बोललो तर तुम्हाला निश्चित किती राग येईल? जेव्हा चुकीचे असू तेव्हा कारवाईचे पूर्णतः अधिकार तुम्हाला आहेत. मात्र, अशा संदर्भातील वक्तव्य योग्य नाही. ते तातडीने कामकाजातून काढून टाका, अशी मागणी करताना निशाणा साधला. नीलम गोऱ्हे त्यावर खुलासा केला. अनावधानाने माझ्या तोंडून ते शब्द आले. सभागृहात दोन्ही बाजूनी सतत गोंधळ घालायचा प्रयत्न होतो. परंतु तुमच्या संदर्भातील विधान तपासते आणि काढून टाकते, असे सांगत वादावर पडदा टाकला.