मॉरीशसला संपन्न झाले आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलन ; मॉरीशस व महाराष्ट्रातील मराठी बांधवांच्या ऋणानुबंधाचे नवे पर्व सुरू
Santosh Gaikwad
December 10, 2023 07:01 PM
मॉरीशस ( प्रतिनिधी ) वाजत गाजत विठोबा माऊलीच्या तालसुरात निघालेली ग्रंथ दिंडी... छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांच्यातील नातेसंबंधावर आधारीत ’स्वराज्य निष्ठा’ नाटीका...लावणी, भारूड, किर्तन सारखे लोककला दाखवणारे कार्यक्रम...दिप नृत्य...मॉरीशसमधील तरूणानी सादर केलेले भन्नाट जाखडी नृत्य...मान्यवर साहित्यीकांचे विचार..काव्य संमेलन, पुस्तक प्रदर्शन.. अश्या भरगच्च साहित्यीक मेजवानीने समृध्द १७ वे आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलन मॉरीशस येथे जल्लोषात संपन्न झाले.
कोकण मराठी साहित्य परिषद आणि मराठी स्पिकींग युनियन मॉरीशस अंतर्गत मॉरीशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरीशस मराठी कल्चर सेंट्रल ट्रस्ट यांच्या सहसंयोजनाने व महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित १७ वे आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलन मॉरीशस येथे संपन्न झाले. या संमेलनासाठी महाराष्ट्रातून १०० साहित्यप्रेमी मॉरीशसला गेले होते.
मॉरीशसमधील मराठी भाषिकांची पाचवी पिढी आता तेथे राहत आहे. शैक्षणिक, साहित्य, राजकारण, शासकीय सेवा अशा विविध ठिकाणी तेथे मराठी माणूस काम पाहत आहे. सातासमुद्रापार अनेक पिढ्या महाराष्ट्रापासून दूर राहूनही मराठी मातीशी असलेल्या ओढीने मॉरीशसमध्ये मराठी साहित्य संमेलन घेऊन आपली संस्कृती, नाते जपण्याचा प्रयत्न मॉरीशसमधील मराठी भाषिक करीत आहेत.
मराठी भाषा जतन करायची जबाबदारी केवळ सरकारची नसून ती आपल्या सगळ्यांची आहे. सध्या मराठी भाषेत बरेच अमराठी शब्द घुसले आहेत, मराठीला लागलेले हे अमराठी वळण थांबवण्याची गरज जेष्ठ पत्रकार, संपादक, लेखक विजय कुवळेकर यानी मॉरीशस येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.
या प्रसंगी भारतीय सांस्कृतिक वारसा परिषद अध्यक्ष माजी खासदार विनय सहस्त्रबुध्दे, मॉरीशसच्या भारतीय दुतावासाच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरीशस सरकारमधील हौसिंग तसेच लॅन्ड ट्रान्सपोर्ट व लाईट रेल्वे मंत्री ऑलन गानू, कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्षा नमिता किर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, मॉरीशस मराठी स्पिकींग युनियन अध्यक्ष नितीन बाप्पू, स्वागताध्यक्ष मॉरीशसच्या निशा हिरू, संमेलनाचे निमंत्रक आमदार संजय केळकर आदी उपस्थित होते. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे परदेशात पहिल्यांदाच साहित्य संमेलन संपन्न झाले.
पहिल्या दिवशी सकाळी पारंपारीक पध्दतीने भारतीय पेहराव नेसून टाळ मृदुंगाच्या जयघोषात मॉरीशसमधील हिंदी विश्व विद्यालयाचा संमेलनात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीत जेष्ठ कवी अशोक नायगावकर, नाट्य अभिनेता अशोक समेळ, कोमसापचे विश्वस्त रमेश किर, कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा, प्रदीप ढवळ, माध्यम सल्लागार जयू भाटकर , लेखिका उषा परब, रायगड कोमसापचे सुधीर शेठ, सिंधुदुर्ग कोमसापचे मंगेश म्हस्के, प्रा. दिपा ठाणेकर, कवयित्री नीतल वढावकर, कवी जनार्दन पाटील आदी मान्यवर सहभागी झाले होते. दिंडीनंतर पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
आमचे पूर्वज महाराष्ट्रातील असून त्यांचा शोध घेऊन नवीन पिढी मराठी संस्कृती व भाषा जतनासाठी ते कार्य करीत आहेत. मराठी भाषेला मॉरीशसमधील अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळालेली असून भाषा जतन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मॉरीशस मराठी स्पिकींग युनियन अध्यक्ष नितीन बाप्पू यानी सांगितले.
कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर आपल मनोगत व्यक्त करतना म्हणाल्या की, मॉरीशस आणि महाराष्ट्र यांच्या मधला मराठी हा महत्वाचा धागा आहे. त्याच्यामुळे या दोन देशांमधील मैत्रीचे बंध अधिक दृढ होतील, तसेच त्यांच्यातील भाषिक व सांस्कृतिक नातेही या संमेलनामुळे अधिक बळकट होईल.
संमेलनाच्या उदघाटनासाठी सूत्रसंचालन अमेय रानडे यानी केले . पहिल्या दिवशी ‘मराठी भाषेचे जतन देशात परदेशात’ यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाचे अध्यक्ष विजय कुवळेकर होते तर, परिसंवादाला वक्ते म्हणून डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, व़ृषाली मगदूम, उषा परब, मॉरीशसमधील निशी हिरू, भालचंद्र गोविंद, किरून नाओजी मोईबीर आदीनी भाग घेतला. सहभागी वक्त्यांनी जगभरात कार्यरत असलेल्या मराठी साहित्य संस्था , मराठी मंडळे यांच्या माध्यमातून होत असलेल्या मराठी भाषेच्या संवर्धन जतन संदर्भातील उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात सर्वानीच मराठी भाषेबद्दल जाज्वल आशावादी असावे असा सूर धरला. परिसंवादाचे सूत्रसंचालन जयू भाटकर यानी केले. पहिल्या दिवशी शेवटचे सत्र कवी संमेलनाचे होते. त्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी अशोक नायगावकर होते. महाराष्ट्र व मॉरीशसमधील २५ हून अधिक कवीनी यावेळी त्यांच्या कविता सादर केल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सत्रात नमन, टाळ नृत्य, गवळण, बुरगुंडा नृत्य, पोवाडा, कोळी नृत्य, मंगळागौर या लोककलाविष्कारानी रंगत आणली. डॉ. प्रांजली ढवळ यांनी सादर केलेली लावणी रसिकांची दाद मिळवून गेली.
संमेलनाच्या दुसरा दिवशी सकाळच्या सत्रात ‘वाचन- बदलता दृष्टीकोन व माध्यम’ या परिसंवादात नमिता कीर , व्यंकटेश भट, दर्शनी गौरिया, अंजू मालो रामगोदाम, प्रतिमा मिश्राम या व्यक्त्यांचा सहभाग होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी लेखिका रेणू दांडेकर होत्या. वाचन चळवळीच्या बदलत्या प्रवाहावर सर्वच वक्त्यांनी मार्मिक विवेचन केले. परिसंवादाचे सूत्रसंचालन सुधीर शेठ यानी केले. त्यानंतर शिवबा नाटकाच्या संपादित नाट्याविष्काराचे अर्थात ‘स्वराज्य निष्ठा’ या नाटीकेचे सादरीकरण करण्यात आले. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. संमेलनाचे निमंत्रक आमदार संजय केळकर यानी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज व प्रा. प्रदीप ढवळ यानी साकारलेला संभाजी महाराज यांच्या भूमिका लक्षवेधक होत्या.
मॉरीशसमधील मराठी भाषिक महिलानी सादर केलेले नृत्य व नाटीका तसेच सभासदांच्या अंगच्या कलागुणांना वाव देणारा कलाविष्कार कार्यक्रमाला रसिकानी भरभरून दाद दिली. दुपारच्या सत्रात ‘आजचा युवक आणि मराठी भाषा’ या चर्चासत्रात मॉरीशसमधील भालचंद्र गोविंद, निशी हिरू, किरण मोहबीर, डॉ. हेमराजन गौरीया, डॉ, बिडेन आब्बा, महाराष्ट्रातील प्रा. गौतम थोरवे, आकाश ढवळ, सुशील वाघुले, राहुल निळे यांचा सहभाग होता. वर्तमान काळातील मराठी भाषा व युवकांच्या भूमिका संदर्भात सर्वानी सकारात्मक विचार व्यक्त केलेल्या या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ, प्रांजली ढवळ व जयु भाटकर यानी केले.
संमेलनाच्या समारोपूर्वी मॉरीशसमधील मराठा मंडळाच्या ३० तरूणांनी कोकणातील पारंपारीक लोककलेचा अविष्कार असलेले जाखडी नृत्याचे सादरीकरण सुरू केले आणि संमेलनाच्या सभागृहात सर्वच उपस्थित रसिकानी प्रतिसाद म्हणून टाळ्यांच्या ठेक्यात त्याला साथ दिली. त्या जाखडी नृत्याच्या सादरीकरणाने भारावलेल्या सर्व रसिकांच्या वतीने जयू भाटकर यानी या मॉरीशस तरूण मंडळींचे जाखडी नृत्य रत्नागिरीत करूया असे सांगताना कोमसापचे विश्वस्त रमेश कीर यानी या प्रस्तावाला मान्यता दिली.
संमेलनाच्या समारोप समारंभात स्वागताध्यक्ष निशी हिरू यानी या संमेलनाने आम्हाला खरा खुरा आनंद दिला असे सांगितले. मराठी स्पिकींग युनियनचे अध्यक्ष नितीन बापू यावेळी म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषदेने आपल्या १०० शिलेदारांच्या उपस्थितीत हे संमेलन मॉरीशसमध्ये करण्याचा घाट घातला , हा प्रसंग मॉरीशस आणि महाराष्ट्र यांच्या ऋणानुबंध भेटीतील एतिहासीक कार्यक्रम आहे. मॉरीशसचे खासदार एशले इट्टू आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले की, मॉरीशसमधील हे संमेलन म्हणजे इथले मराठीजन आणि कोमसाप यांच्या मैत्रीचे हे नवीन पर्व आहे. या मैत्रीभेटीच्या भविष्याच्या वाटचालीत आपण विविध साहित्य उपक्रमांच्या निमित्ताने सतत संपर्कात राहूया.
कोमसापचे विश्वस्त रमेश कीर आपल्या भाषणात म्हणाले की, या संमेलना निमित्ताने या दोन देशात भाषेच्या माध्यमातून नवीन भावबंध निर्माण होत आहेक, त्यात सातत्य राखुया. मॉरीशसमधील मराठी बांधवांसाठी भविष्यात काही पुस्तके भेट म्हणून पाठवण्याबद्दल आपला पुस्तक भेटीचा व्यक्तीगत सहभाग यावेळी जाहीर केला.
मॉरीशसमधील मराठी बांधवांच्या मराठी भाषेबद्दलच्या जाज्वल प्रेमाचा आणि अभिमानाचा गौरवाने उल्लेख करताना कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर यानी मॉरीशसमधील या संमेलनात सहभागी झालेल्या तीनही मंडळांच्या प्रतिनिधी व सदस्याना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण देऊन कोमसापने आधुनिक कवीतेचे जनक कवी केशवसुत यांच्या जन्मगावी मालगुंड येथे जे देखणे स्मारक उभारले आहे, त्याला आवर्जून भेट द्यावी असे सांगितले.
कोमसापचे कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यानी हे संमेलन म्हणजे एक एतिहासीक पाऊल आहे, या संमेलनातून मॉरीशस व महाराष्ट्राचे नवे ऋणानुबंध निर्माण होतील असा आशावाद व्यक्त केला. संमेलनाचे अध्यक्ष विजय कुवळेकर यानी यावेळी आपल्या भाषणात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या या संमेलनाबद्दल कोमसाप परिवार संयोजन सहभाग असलेल्या मॉरीशसमधील मराठी स्पिकींग युनियन, मॉरीशस मराठी कल्चरल सेंटर, मॉरीशस मराठी फेडरेशन या सर्वांचे अभिनंदन केले. भविष्यात हे संमेलन मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
यावेळी अध्यक्षा नमिता किर यानी यावेळी विविध ठरावांचे वाचन केले. यात प्रामुख्याने मराठी भाषा विभागाने कायमस्वरूपी ग्रंथ संग्रहालयाचे आयोजन मॉरीशसला करावे, मॉरीशसमधील मराठी भाषा शिकवत असलेल्या शिक्षकाना भाषा प्रशिक्षण देणे, मॉरीशसमधील कलागुणांचे दर्शन घडवणारा मॉरीशसमहोत्सव महाराष्ट्रात तर मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा महोत्सव मॉरीशसध्ये आयोजित करावा, मराठी भाषा संवर्धन व प्रसारसाठी शिखर परिषद मुंबईत आयोजित करावी, लेखक कै. प्र, शी. नेरूरकर व जेष्ठ संपादक माधव गडकरी यांचे तैलचित्र मॉरीशस संसद भवनात लावावे असे प्रस्ताव संमेलनात बहुमताने संमत झाले.
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे मॉरीशसमधील ग्रंथालयासाठी ५०० पुस्तके यावेळी सदस्यानी भेट स्वरूपात दिली. दोन दिवस चाललेल्या साहित्य संमेलनात मॉरीशसमधील मराठी भाषिकांचे प्रेम व आपुलकी महाराष्ट्रातून गेलेल्या मराठी भाषिकानी या निमित्ताने अनुभवली.