एकनाथ शिंदे कार्यसम्राट मुख्यमंत्री : नरेंद्र वाबळे
Santosh Gaikwad
January 29, 2024 11:38 AM
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रांत्रदिवस काम करणारे कार्यसम्राट मुख्यमंत्री आहेत. राज्यातील जनतेसाठी परिश्रम करणारा, इतका काम करणारा मुख्यमंत्री मी तरी पाहिलेला नाही. हे गांभीर्यपूर्वक सांगतो असे प्रतिपादन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, शिवनेर चे संपादक नरेंद्र वि. वाबळे यांनी ठाणे येथे केले. कोळी समाजाचे मुखपत्र असलेल्या सागर शक्ती या मासिकाच्या २१ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र राज्य शाखेच्यावतीने सागर शक्ती या मासिकाचा वर्धापन दिन ठाण्यातील आनंद भारती या सभागृहात पार पडला. यावेळी नरेंद्र वाबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय कोळी समाजाचे प्रदेश अध्यक्ष केदार लखेपुरिया, युवा प्रदेश अध्यक्ष मनोज गोविंदवाड, अजिंक्य पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल नाखवा, सागर शक्ती चे संपादक राजहंस टपके, सहसंपादक सचिन ठाणेकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
पुढे बोलताना वाबळे म्हणाले की, रूग्णसेवेमध्ये मुख्यमंत्र्यांचे काम खूप मोठं आहे. गोरगरीब रूग्णांवर उपचार असो, वा ऑपरेशन राज्य शासनाच्या माध्यमातून नेहमीच आर्थिक मदत करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ओळख सार्थ ठरविली आहे. यावेळी वाबळे यांनी अनेक मुख्यमंत्रंयाचे किस्से सांगितले. कोळी समाजाचे मुखपत्र असलेल्या सागर शक्तीला शुभेच्छा देत, कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन वाबळे यांनी यावेळी दिले.
दरम्यान चेंदणी कोळीवाडा येथील स्व नारायणराव कोळी यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करीत बॅन्डच्या गजरात आनंद भारती सभागृहापर्यंत रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात कोळी बांधव, भगिनींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश तरोळे़ - पाटील यांनी केले.