मुंबई, : लोकल ट्रेननंतर बेस्ट सेवा ही मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. परंतु आपल्या सर्वांना बेस्टची सुविधा योग्य पद्धतीने पुरवली जावी, याकरिता कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मात्र अनेक प्रश्न प्रलंबित होते. यामध्ये प्रामुख्याने बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील ७२५ नैमित्तिक कामगार पर्मनंट करण्याच्या मागणीसाठी मागील १६ वर्षांपासून संघर्ष करत होते.
याकरिता बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील ७२५ नैमित्तिक कामगार १६ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले होते. त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी श्रमिक उत्कर्ष सभेशी संलग्न असलेल्या द इलेक्ट्रिक युनियनचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी तात्काळ कामगारांची भेट घेतली. यावेळी आमदार लाड यांनी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी उपोषणकर्त्या कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला आहे.
बेस्ट उपक्रमातील ह्या ७२५ नैमित्तिक कामगारांमध्ये ९० टक्के कामगार मराठी असून, बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कामगारांच्या मुलांना विद्युत विभागात अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्याऐवजी, नैमित्तिक कामगार म्हणून रोजंदारीवर घेण्यात आले होते. यामुळे पर्मनंट करण्याच्या मागणीसाठी १६ वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरु होता.
कामगारांची बाजू जाणून घेतल्यावर आमदार लाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने आणि श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून बेस्टच्या १२३ कंत्राटी कामगारांना तात्काळ पर्मनंट करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी तसेच जीएम यांनी दिले आहे. तसेच उर्वरित ६०० कामगारांना टेंपररी करण्यात येईल असे देखील सांगितले आहे. यापुढील काळात जागा उपलब्धतेनुसार टेंपररी कामगारांना देखील पर्मनंट करण्यात येणार असल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली आहे. हा कामगार एकजुटीचा विजय असल्याचे मत आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.