मुंबई, दि. ६ सप्टेंबर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात शांततेने आंदोलन सुरु असताना शुक्रवारी पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. पोलीसांनी निर्दयीपणे मारहाण केली, लोकांची डोकी फोडली. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती त्याला देशभर प्रसिद्धी मिळत होती त्यावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी हा प्रकार जाणीवपूर्वक केला आहे. फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
जनसंवाद यात्रेदरम्यान नाना पटोले गडचिरोलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर केलेला लाठीमार हे राज्य सरकारने जाणीवपूर्वक केलेले पाप आहे. आरक्षण देताना कोणाच्याही तोंडचा घास हिरावून घेऊ नका व तणाव निर्माण करु नका. ओबीसी ही आग आहे, त्या आगीत हात टाकू नये एवढाच सरकारला आमचा सल्ला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच मार्ग आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणा करावी सर्व समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. भाजपाला आरक्षण देता येत नसेल तर त्यांनी केंद्र व राज्यातील सत्तेतून खाली उतरावे आम्ही मराठा समाजासह सर्व समाजाला न्याय देतो.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा गडचिरोली जिल्ह्यात पोहचली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात पदयात्रा काढण्यात आली व संध्याकाळी जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इमरान प्रतापगढी हे उपस्थित होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुलढाणा जिल्ह्यात जनसंवाद यात्रेत सहभाग घेतला. नागपूर जिल्ह्यात माजी मंत्री व काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद कोराडी येथे पदयात्रा काढण्यात आली.