आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार !

Santosh Gaikwad March 15, 2024 10:47 AM


मुंबई : लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू या दोन अधिकाऱ्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  त्यामुळे आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना नवनियुक्त आयुक्त मदत करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन दास यांच्या समितीने या दोन्ही नावांना संमती दिल्याची माहिती आहे.

अरूण गोयल यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्यानंतर एकून रिक्त पदांची संख्या दोन झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलून या निवडी केल्या आहेत. अरुण गोयल यांच्या नियुक्तीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की त्यांची नियुक्ती ही घाईगडबडीत करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर बलविंदर संधू आणि ज्ञानेश कुमार या दोन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.