नागपूरमध्ये शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईची रक्कम हडपली : अंबादास दानवेंचा आरोप

Santosh Gaikwad July 05, 2024 06:50 PM


मुंबई, दि. ५ः
 नागपूरमध्ये अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी मिळालेले लाखो रूपये सरकारी बाबूंनी शेतकर्‍यांच्या बोगस नावांनी लाटल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विशेष उल्लेखतंर्गत विधान परिषदेत केला. दरम्यान, संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी परिषदेत दिली.  

नागपूरमध्ये २०२२-२३ या वित्तीय वर्षात झालेल्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीसाठी मदत म्हणून राज्य शासनाने शेतकर्‍यांना प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपये मदत घोषित केली होती. मात्र नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात महसूल अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी बोगस शेतकर्‍यांची नावे शासनाला सादर करत अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे पैसे परस्पर बोगस शेतकर्‍यांच्या नावे वळते केल्याचे शासकीय कागदपत्रांवरून सिद्ध झाले आहे. यासाठी मूळ शेतकर्‍याचा खसरा क्रमांकाचा वापर केला आहे. जिल्ह्याच्या नियोजन मंडळातील भाजपच्याच एका कार्यकर्त्यांने माहिती अधिकारातून ही विश्वसनीय माहिती मिळवून घोटाळा उघड केल्याचे दानवे म्हणाले. या प्रकरणात तलाठ्यापासून ते थेट तहसीलदारापर्यंत अडकले आहेत, असा आरोप केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी केली. दरम्यान, संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.