दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून काँग्रेसची कमिटी विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करणार

Santosh Gaikwad May 28, 2024 07:38 PM

मुंबई, दि. २८ मे : राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची मोठी समस्या असून रोजगारही मिळत नाहीत.  जनता दुष्काळाने होरपळ असताना महायुती राजकीय साठमारीत व्यस्त आहेत त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समित्यांची स्थापना केली आहे. या समित्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना व प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार आहेत.


प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेवरून विभागवार जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मराठवाडा विभागाच्या समितीचे प्रमुख आहेत. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात ह्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी दिली आहे. नागपूर विभागाच्या समितीचे प्रमुख विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत. पश्चिम महाराष्ट्राचे समिती प्रमुख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. कोकण विभाग समितीचे प्रमुख प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान आहेत तर अमरावती विभाग समिती प्रमुख माजी मंत्री यशोमती ठाकूर आहेत. या समितीत राज्यातील प्रमुख नेते, आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी यांचाही समावेश आहे. ही समिती दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार असून विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहेत तसेच प्रदेश काँग्रेसला आपला अहवाल देणार आहेत.
*****