मुंबई, दि.५ः टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. मात्र विधिमंडळात होणाऱ्या मुंबईकर खेळाडूंच्या सत्कार समारंभावरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये लेखी निमंत्रणाच्या मुद्द्यावरून जोरदार सामना रंगला. अखेर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्या सभासदांना प्रत्यक्ष संयोजक म्हणून निमंत्रण देत वादावर पडदा टाकला.
प्रश्नोत्तराच्या तासांत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी, विधानभवनात मुंबईकर खेळाडूंच्या अभिनंदनचा मुद्दा उपस्थित करताना, सरकारच्यावतीने दिलेल्या जाहिरातीचा समाचार घेतला. विधानभवनात कार्यक्रम होत असताना, उपसभापतींचे किंवा खेळाडूंची नाव किंवा फोटो छापले नाहीत. कार्यक्रमाचे वरिष्ठ सभागृहाला ही साधे निमंत्रण दिलेले नाही. केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो छापले आहेत. देशाच्या विशेषतः मुंबईतील खेळाडूंचा सत्कार हा विषय अभिमानाचा आहे. त्यासाठी दोन्ही सभागृहातील सदस्यांना निमंत्रित करावे, अशी विनंती केली. शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनीही जगताप यांच्या मुद्द्याला दुजोरा दिला. विरोधी पक्षाला चांगल्या कार्यक्रमापासून बाजूला ठेवल्याची खंत व्यक्त केली. भाजपचे प्रवीण दरेकर यांनी मुद्द्याचे समर्थन करतानाच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या छापलेल्या फोटोवरून टीका केली. सरकारने सत्कार सोहळ्याला शंभर फोटो छापणार का, असा प्रश्न विचारला. खेळाडूंसाठी गुजरातवरून बस आणली. त्यावरून टीका करणारे विरोधक कोत्या मनाचे असल्याचे म्हटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी त्याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे मोठा गदारोळ झाला, निलम गोऱ्हे यांना त्यामुळे हस्तक्षेप करावा लागला.
कुठलाही महत्त्वाचा कार्यक्रम असला की विधान परिषदेत गदारोळ होतो. परंतु, मी काही बोलायच्या आधीच तुम्ही गदारोळ करता. विशेषतः खेळाडूंच्या सत्कार समारंभावरून गदारोळ करून सभागृह तहकूब करणे योग्य नाही. कार्यक्रम गुरुवारी ठरला होता. मात्र, आता कार्यक्रमाची अप्रत्यक्ष संयोजक म्हणून टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्याला सगळ्यांनी उपस्थित राहावे, असे निमंत्रण देत नीलम गोऱ्हे यांनी वादावर पडदा टाकला.