बेस्टच्या संपाचा सहावा दिवस : प्रवाशांचे हाल, पालकमंत्री लोढा म्हणाले, ४८ तासात पूर्ववत करू !
Santosh Gaikwad
August 07, 2023 06:20 PM
मुंबईत : मुंबईतील बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. आजचा संपाचा सहावा दिवस आहे. संपावर अजूनही तोडगा निघाला नसल्याने सलग सहाव्या दिवशी सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, येत्या २४ ते ४८ तासात पूर्ववत करणार असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा अशा विविध सुविधा ही कंत्राटी कर्मचारी मागणी आहे. हे सर्व कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहील, असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. भाडेतत्त्वावरील १ हजार ६७१ बसपैकी ७०४ बस आगारातच उभ्या असल्याने प्रवाशी वाहतूक ही खोळंबली आहे. याचा फटका हा प्रवाशांना बसला आहे.
बेस्टचे कायम स्वरूपी चालक कंत्राटी कामगारांच्या गाड्या चालवत असल्याने आंदोलक कर्मचाऱ्यांनी त्यांना धमकावणे सुरू केले आहे. यामुळे पोलीसात तक्रार देण्यात आली असून मालवणी आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासाने एसटीबसचा आधार घेतला आहे. तब्बल १५० गाड्या प्रवाशांना घेऊन धावत आहेत. प्रवाशांसोबत विद्यार्थ्यांची देखील या संपामुळे गैरसोय झाली आहे.
पुढील २४ ते ४८ तासात बेस्ट ची सेवा पूर्ववत होणार- मंत्री मंगलप्रभात लोढा
येत्या २४ ते ४८ तासात पूर्ववत करणार असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. बेस्टच्या ताफ्यात एकूण ३०५२ बसेस आहेत. त्यापैकी १३८१ बसेस ह्या बेस्ट च्या मालकीच्या असून, १६७१ बसेस भाडे तत्वारवार आहेत. बेस्टच्या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारद्वारे बेस्टच्या ताफ्यात ३०५२ बसेस पैकी २६५१ बसेस नागरिकांच्या सेवेत कार्यरत करण्यात आलेल्या आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या च्या सहयोगाने १८० बसेस, २०० पेक्षा जास्त स्कुल बसेस सुद्धा नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सध्या ४०० बसेसचा तुटवडा असून, तो भरून काढण्यासाठी आणि आवश्यक चालक शोधण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
कंत्राटी कामगारांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यासंदर्भात भाडेतत्वारवारील बसेसच्या मालकांसह, दोन वेळा बैठक घेण्यात आली. यावेळी कामगारांची किमान वेतनाची मागणी, त्यांचा दिवाळी बोनसचा विषय, त्यांना आवश्यक सोयी सुविधा, या सर्वांची कायदेशीर पूर्तता व्हावी असे सरकारतर्फे बसेसच्या मालकांना सांगण्यात आले. कंत्राटी कामगारांच्या मागण्या सोडवण्याबाबत सरकार उदासीन नाही आणि याबाबत पुन्हा एक बैठक घेऊ, असे देखील मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले. "नागरिकांना कोणताही त्रास नको आणि त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय मिळावा असे सरकारचे धोरण असून, त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच पूर्ण क्षमतेने बेस्टची सेवा रुजू होईल असे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.