मविआत मतभेद नाही: एकत्र पत्रकार परिषद घेऊन नेत्यांचा खुलासा
Santosh Sakpal
May 14, 2023 07:19 PM
MUMBAI : महाविकास आघाडीची बैठक रविवारी, १४मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झाली. दुपारी साडेचार सुमारास ही बैठक झाली असून या बैठकीला स्वतः शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, नसीम खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड असे महाविकास बडे नेते उपस्थितीत होते. या मविआच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर जयंत पाटील, नाना पटोले आणि संजय राऊत यांनी एकत्ररित्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मविआत कोणतेही मतभेद, वाद नसून आम्ही सर्व एकत्र असल्याचा खुलासा केला.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातील जयंत पाटील म्हणाले की, ‘कर्नाटकात नुकत्याच ज्या निवडणूका झाल्या, त्यामध्ये भाजपचा पराभव झाला. आज मविआची पवारांच्या सिल्व्हर ओकवर बैठक झाली. या बैठकीत निवडणुकाचा आढावा घेण्यात आला. ज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, वेगवेगळ्या एजन्सीचा गैरवापर आणि स्थानिक दृष्ट्या त्या सरकारचे जनतेला आलेले अनुभव याचा प्रत्यंत्तर त्या निवडणुकीत आला. या सर्वांचा आढावा आज घेण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालावरही सादकबादक चर्चा करण्यात आली. त्याबाबतीत पुढे कोणकोणत्या गोष्टी होण्याची शक्यता आहे, याबाबत चर्चा करण्यात आली. अध्यक्षांना आता जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे, या सगळ्याचा आढावा घेण्यात आला. तसेच उन्हाळा असल्यामुळे मविआच्या बैठका प्रलंबित ठेवल्या आहेत. त्या उन्हाळा थोडा कमी झाल्यानंतर पावसाचा अंदाज बघून पुन्हा सुरू करणार आहोत. तिन्ही पक्ष मिळून, एकसंघाने भविष्यात येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत चर्चा हळूहळू सुरू करणार आहोत. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात देखील मविआ येत्या काळात अधिक ताकदीने काम करेल.’
‘सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरेंविरोधात नाही’
पुढे नाना पटोले म्हणाले की, ‘भविष्यात मविआ राज्यातील घटनाबाद्य सरकारच्या विरोधात लढणार आहे. कर्नाटकाच्या निकालामुळे मविआला बळकटी आली आहे. कर्नाटकातील विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरेंविरोधात नाही. शिवाय मविआत कोणताही वाद नाही, आम्ही सर्व एकत्र आहोत.’ ‘गेल्या १ तासांहून अधिक काळ खुल्या मनाने आमची चर्चा झाली आहे. जे तुम्ही दाखवता ते आतमध्ये होत नाही. आजची बैठक ही ऐतिहासिक बैठक आहे. कर्नाटकमध्ये फक्त काँग्रेस जिंकली नाहीतर संपूर्ण देशातील विरोधी पक्ष जिंकले आहेत. काँग्रेसच्या विजयामुळे संपूर्ण देशाला एक नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रही आहे,’ असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.